राष्ट्रवादीची सभा नगरला पण नजर चार जिल्ह्यांवर

पुणे, ५ जून २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ९ जून रोजी अहमदनगर शहरात मोठी सभा होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. पुणे जिल्ह्यातून एक हजार गाड्या तेथे आल्या पाहिजेत असे फर्मान आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सोडले आहे. अजित पवार यांनी अहमदनगरमध्येच का सभा घेण्यात येत आहे, याचे कारणही त्यांनी सांगून टाकले असले तरी या नगरमध्ये राष्ट्रवादीचे मोठे शक्तीप्रदर्शन होत असले तरी चार जिल्ह्यातील मतांवर राष्ट्रवादीचा डोळा आहे.

अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीचा वर्धापनदिन १० जूनला आहे. त्या आधी अहमदनगरला ९ जून रोजी पक्षाची सभा आयोजित करण्यात आली आहे. या जिल्ह्याला लागून असलेल्या पुणे, बीड, नाशिक या जिल्ह्यांमधून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येतील, असे पवार यांनी स्पष्ट सांगितले. तसेच या जिल्ह्यांमध्ये पक्षाची मोठी ताकद आहे. आमदारांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे नगरला मेळावा घेण्यात येत आहे. नऊ जूनला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सभा होईल.
अहमदनगरमधील केडगाव भागात ही सभा होत आहे. त्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात संग्राम जगताप, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, किरण लहामटे, निलेश लंके हे पाच आमदार आहेत. आमदारांवर मेळाव्यासाठी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी हे आमदार गेल्या दोन दिवसांपासून जोरदार तयारीला लागले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीसाठी बीड, अहमदनगर, नाशिकमधील लोकसभा जागा महत्त्वाच्या आहेत. त्यात अहमदनगर लोकसभा जागाही राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदा खासदार सुजय विखे यांच्याविरोधात तगड्या उमेदवाराच्या शोधात राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची मानली जात आहे. या सभेतून नगरमध्ये लोकसभा निवडणुकीची रणशिंगही राष्ट्रवादीकडून फुंकले जाणार आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप