नवनीत राणा यांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा – शिंदे सरकारची केली पाठराखण
अमरावती, ३० ऑक्टोबर २०२३: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसंच शिंदे सरकार हे मराठा आरक्षण देण्याबाबत गंभीर आहे. त्यांना समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करतायचं आहे. त्यामुळे मी मनोज जरांगेंना विनंती करते की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहनही केलं आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मानसिकता स्पष्ट आहे की समाजातला कुठलाही घटक वंचित राहू नये. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. एक खासदार म्हणून माझा त्यांना पाठिंबा आहे. मी त्यांचे व्हिडीओ पाहिले, सहा दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. त्यांचा आवाज खोल गेला आहे, हात कापत आहेत. ते आंदोलन पुढे नेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या बरोबर आम्ही सगळे आहोतच पण काही गोष्टी, कागदपत्रं, काही औपचारीकता यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे. मी तुम्हाला मात्र हे सांगू इच्छिते की आम्हीही लढणारे आहोत. आम्ही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारेच आहोत. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी सरकार आहेच.
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी जेवढ्या चर्चा केल्या, बैठका घेतल्या तेवढ्या आधी कुणीही केल्या नाहीत. आज जे सरकार आहे ते मराठा बांधवांना न्याय मिळण्यासाठीच काम करतं आहे. जेव्हा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हा कुणाचं सरकार होतं? कागदपत्रं का पुरवली गेली नाहीत याचाही विचार झाला पाहिजे. मात्र शिंदे फडणवीस सरकार असं नाही. तसंच आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जे लढा देण्यात विश्वास ठेवतात, आम्ही सगळे मनोज जरांगेंच्या बरोबर आहोत असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
तसंच मी मराठा बांधवांना आणखी एक विनंती करते की कुणीही आत्महत्या करु नये. छत्रपती शिवरायांनी लोकांना वाचवण्यासाठी लढा दिला. त्यामुळे कुणीही आत्महत्या करु नये असंही आवाहन नवनीत राणा यांनी केलं आहे.
आम्ही किती वेळ द्यायचा? मनोज जरांगे पाटील यांचा प्रश्न
मराठा समाजापेक्षा कुणीही मोठं नाही कारण मी या समाजालाच सगळं काही मानतो. असं म्हणत उपस्थितांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांना पाणी पिण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने विनंती केली. जी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केली. तुम्ही कुणीही हट्ट करु नका, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या दिवशी त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मुख्यमंत्र्यांनी जो वेळ मागितला आहे तो नेमका किती वेळ द्यायचा? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे.