नाना पटोलेंचे तांबे कुटुंबाबद्दलचे वक्तव्य अर्धसत्य – सत्यजित तांबेंची थेट टीका
नाशिक, २८ जानेवारी २०२३: विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ केंद्रस्थानी आला असून येथे महाविकास आघाडीचा पाठिंबा लाभलेल्या शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे याच्यात थेट लढत होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे कुटुंबात वाद असल्याचा आरोप केला आहे. याच आरोपांवर आता सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया देत नाना पटोले अर्धसत्य सांगत आहे, अशी थेट टीका केली.
तांबे म्हणाला, “मी काँग्रेसचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी मागील २२ वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आलो आहे. आमच्या परिवाराला २०३० साली काँग्रेस पक्षात १०० वर्षे पूर्ण होतील. आम्ही काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागितली होती. मात्र एबी फॉर्म न मिळाल्यामुळे माझी उमेदवारी अपक्ष झाली आहे. नाना पटोले जे सांगत आहेत त्याविषयी आम्ही लवकर सविस्तरपणे राजकीय भूमिका मांडू. नाना पटोले जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. जेव्हा मी सत्य मांडेन तेव्हा सगळेच चकित होऊन जातील.
दरम्यान, उमेदवारीवरून तांबे कुटुंबात वाद आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. “नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दोन कोरे एबी अर्ज पाठवले होते. ऐनवेळी अशी धोकेबाजी होईल, याची कल्पना नव्हती. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध केला नव्हता. तसे असते तर कोरे अर्ज पाठवले नसते. आम्ही प्रामाणिक असल्याने उमेदवारीला विरोध केल्याचे अप्रमाणिक लोकांनी आरोप करू नये. मुळात उमेदवारीवरून तांबे कुटुंबीयात संघर्ष होता,” असे नाना पटोले म्हणाले. तसेच तांबे कुटुंबाच्या वादात काँग्रेसला आणू नका. पक्ष कुणाच्या घरचा नसतो. तो कार्यकर्त्यांचा असतो, असेही त्यांनी नमूद केले.