नाना पटोले काँग्रेस भवनात असताना काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
पुणे, २२ जून २०२४ : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुणे दौर्यादरम्यान शनिवारी काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्ते व राहुल प्रियंका गांधी सेनेचे प्रदेशाध्यक्ष मुकेश धिवार यांना काँग्रेसच्याच तीन ते चार जणांनी मारहाण केली. या मारहाणीत धिवार यांच्या कपाळावर गंभीर जखम झाली. दरम्यान, हल्ला करण्यात माजी नगरसेवक आबा बागुल यांच्या मुलाचा हात असल्याचा आरोप धीवार यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी चिंतन बैठक झाली. या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी काँग्रेस भवनच्या परिसरात जमले होते. त्यामध्ये मुकेश धिवार यांचाही समावेश होता. यावेळी तीन ते चार जणांनी अचानकपणे धिवार यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत धिवार यांच्या कपाळावर मोठी जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी धाव घेतल्यानंतर मारहाण करणार्यांनी पळ काढला. एका पोलिस कर्मचार्याने पाठलाग करून एका हल्लेखोराला पकडले.
दरम्यान, या हल्ल्यात माजी नगरसेवक आबा बागुल यांचा मुलगा कपील बागुल याचा हात असल्याचा आरोप धिवार यांनी केला आहे. दरम्यान, नाना पटोले यांचे काँग्रेस भवनमध्ये आगमन झाल्यानंतर धिवार यांनी तुमच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आल्याचे सागत सोबत आणलेला फ्लेक्स पटोले यांना दाखवला. त्या फ्लेक्सवर आता तरी याच्यामध्ये बदल होणार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करत शहरातील काँग्रेसच्या नेत्यांची नावे दिलेल्या खुर्च्या होत्या. यापूर्वीही धिवार यांनी काँग्रेस भवनसमोर फडणवीसांची भेट घेणार्या बागुल यांची हाकालपट्टी करा, असा फ्लेक्स फडकावला होता.
हल्ले खोरांशी संबंध नाही ः बागुल
मुकेश धिवार आणि माझा कसलाही संबंध नाही. त्यांनी आणलेल्या फ्लेक्सवर माझे नावही नव्हते. त्यांना ज्यांनी मारहाण केली त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही. विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून माझ्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे.
– आबा बागुल, माजी नगरसेवक, काँग्रेस