कसब्यासाठी शिवसेनेकडून संजय मोरे यांचे नाव; आघाडीत होणार बिघाडी
पुणे, ३० जानेवारी २०२३ : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतला आहे. शहरातील पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली यामध्ये सहप्रमुख संजय मोरे यांना उमेदवार म्हणून समोर आणले जाणार आहे. तसेच बैठकीनंतर उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा करून हा निर्णय सांगितला आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेसनेही विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केलेली असताना शिवसेनेच्या खेळीने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
कसबा विधानसभेची पोट निवडणुक 26 फेब्रुवारी रोजी होत असून सात फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायची आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी एक आठवडा उरलेला असताना शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये अद्याप चर्चा झालेली नाही. ही निवडणूक महाविकासआघाडी म्हणून लढवायची की सर्व पक्ष स्वतंत्र लढणार यावर निर्णय घेण्यास या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वेळ मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम आहे तर दुसरीकडे भाजपने बैठका घेण्यास सुरुवात करून प्रचाराचा नारळ फोडलेला आहे.
पुण्यात काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यामध्येसंजय मोरे यांना उमेदवार करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून मोरे हे आपले उमेदवार असू शकतात असा प्रस्ताव मातोश्रीला देण्यात आलेला आहे त्याबाबत अद्याप उद्धव ठाकरे व इतर नेत्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
भारत जोडो यात्रेच्या समारोपासाठी काँग्रेसचे पदाधिकारी जम्मू-काश्मीरला गेले होते ते आज परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन-तीन दिवसात महा विकास आघाडीचे बैठक होऊन या निवडणुकीबाबत निर्णय घेतील मात्र या जागेवर शिवसेनेने दावा केल्याने आघाडीमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.