चिंचवडमधील विजयानंतर माय-लेकींना अश्रू अनावर
चिंचवड, २ मार्च २०२३ : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांच्या मुलीने लक्ष्मण जगतापांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी माय-लेकींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थितांनी ‘अमर रहे, अमर रहे, लक्ष्मण जगताप अमर रहे’ अशा घोषणा दिल्या.
अश्विनी जगताप लक्ष्मण जगताप यांनी अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर डोकं ठेवलं. त्यावेळी त्या भावनिक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झालं. यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी जगताप यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीच्या मृत्यूच्या दुःखाने अश्विनी जगताप यांच्या डोळ्यात पाणी आले.
अश्विनी जगताप यांच्यानंतर त्यांच्या मुलीनेही स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन वडिलांना आदरांजली वाहिली. मात्र, आईनंतर तिलाही भावना अनावर झाल्या आणि तिलाही अश्रू अनावर झाले. यानंतर महिला कार्यकर्त्यांनी तिलाही सावरलं. यावेळी मुलीने वडिलांच्या आठवणीत टाहो फोडतानाचा ‘अमर रहे, अमर रहे’ अशी घोषणा दिली. यानंतर उपस्थितांनी ‘लक्ष्मण जगताप अमर रहे’ म्हणत घोषणा पूर्ण केली.
पिंपरी चिंचवडच्या विजयानंतर जगताप माय-लेकीला भावनिक झालेलं पाहून कार्यकर्त्यांचेही डोळे पाणवले. यावेळी सर्वांनीच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आदरांजली वाहिली.
चिंचवड निवडणुकीवर अश्विनी जगताप म्हणाल्या, “ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. गड आला, पण सिंह गेला. लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं, त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचा गड राखायचा होता. तो गड सर्वांनी राखला आहे.”
“माझा सुरुवातीपासून सर्वांवर विश्वास होता. मी हा विजय दिवंगत लक्ष्मण जगताप आणि सर्व सामान्य नागरिकांना समर्पित करते. माझे वरिष्ठ नेते जेव्हा सांगतील तेव्हा मी अधिवेशनालाही येणार आहे. मी सर्वसामान्यांचा आमदार म्हणून काम करेन. सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले असतील,” असं मत अश्विनी जगताप यांनी व्यक्त केलं.
राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा झाला का?
राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा झाला का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अश्विनी जगताप म्हणाल्या, “नक्कीच, राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा मला फायदा झाला.”
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६,०९१ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना ३७ व्या फेरीअखेर एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाली. दुसरीकडे महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मतं मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मतं मिळाली. यामुळे कलाटेंच्या बंडखोरीचा अश्विनी जगताप यांना फायदा झाल्याचंही बोललं जात आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप