मुरलीधर मोहोळ यांच्याकडे २४.३२ कोटीची संपत्ती
पुणे, २५ एप्रिल २०२४ ः पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची एकूण संपत्ती २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपये असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोहोळ यांच्यावर १४ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज आहे.
मोहोळ यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे. स्वतः मोहोळ, त्यांची पत्नी आणि दोन मुली यांच्या नावाने एकूण जंगम मालमत्ता ५ कोटी २६ लाख ७६ हजार ७८८ रुपये इतकी आहे. यामध्ये मोहोळ यांच्या केवळ ९ हजार १९२ रुपयांची रोख आहे. तर पत्नीच्या हातात १ लाख २१ हजार १२४ रुपये रोख आहे. मोहोळ यांच्या नावाने बँकेमध्ये ६६ लाख ७४ हजार २०७ रुपयांची ठेवी आहेत, पत्नीच्या नावाने २ लाख ७१ हजार २७३ तर दोन मुलींच्या नावाने प्रत्येकी अनुक्रमे ४९ हजार ९८१, १०६८९ रुपये इतक्या रुपयांच्या ठेवी आहेत.
मोहोळ यांची एकूण स्थावर मालमत्ता १९ कोटी ५ लाख ६७ हजार ६९५ इतकी आहे. त्यामध्ये मुळशी तालुक्यातील मुठा गावात ३६ गुंठे, कासार आंबोळी येथे २७ गुंठे, भूगाव येथे १४ गुंठे जमीन आहे. तर वाई तालुक्यातील येरुली गावात ३.१८ एकर जमीन आहे. पुणे शहरात कोथरूड येथे एक ५ हजार २४५ चौरस फुटाचा बंगला असून त्याची किंमत ५ कोटी ४७ लाख ८१ हजार ११४ इतकी आहे. तर ४५० चौरस फुटाच्या फ्लॅटची किंमत ३४ लाख ४० हजार इतकी आहे. मोहोळ यांच्या कुटुंबाकडे ४१ तोळे सोन्याचे दागिने आहेत.
तर २२ लाख १४ हजार ३८२ रुपयांचे एकच वाहन आहे.