मोदी व भाजपने माफी मागावी : नाना पटोले

मुंबई, २ जुलै २०२४ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवीत आहेत. त्यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली आहे म्हणूनच चिडून भाजपच्या खासदाराने लोकसभेत राहुल गांधी यांची जात विचारली. भाजपने जात विचारून फक्त राहुल गांधी यांचाच अपमान केला नसून एससी, एसटी, भटक्या विमुक्त, आदिवासी, मागास तसेच ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींना जात विचारल्याने काँग्रेस कार्यकत्यांमध्ये संताप आहे. बहुजन समाजामध्येही भाजपविरोधात तीव्र संताप आहे. काँग्रेस कार्यकत्यांनी आज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन केले व भाजपच्या या मनुवादी वृत्तीचा जाहीर निषेध केला. जात विचारणाऱ्या भाजप खासदार अनुराग ठाकूर यांची माफी नको, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. कितीही अपमान केला, शिव्या दिली तरी बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यावर व जातनिहाय जनगणना करण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. अनुराग ठाकूर यांच्या विधानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन करणे अत्यंत गंभीर आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप