मराठा आंदोलक विनोद पाटील लोकसभेच्या मैदानात
छत्रपती संभाजीनगर, २ मार्च २०२४ ः मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयात याचिका दाखल करणारे विनोद पाटील आता राजकारणाच्या मैदानात उतरणार आहेत. विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वतःच याबाबतची घोषणा केली आहे. विनोद पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्व प्रकारची लढाई आम्ही लढलो आहे. आता आम्हाला वाटतंय की, संसदीय पद्धतीने लढाई लढावी लागेल. समाजाला आता याच मार्गाने न्याय देता येईल असं आम्हा सर्व मराठा आंदोलकांना वाटतंय. त्यामुळेच माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्याचा अग्रह केला आणि मीसुद्धा निवडणूक लढवण्यास सज्ज आहे.
विनोद पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढलो, न्यायालयीन लढाई लढलो. परंतु, आता आमच्या लक्षात आलं आहे की, समाजव्यवस्थेत आनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न आणि आरक्षणाचा विषय संसदेत नेला पाहिजे. सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी मला निवडणूक लढवण्याचा आग्रह केला, सर्वजण मला म्हणाले की तुम्ही आता संसदेत गेलं पाहिजे. देशात तरुणांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिला संरक्षणाचा आणि वेगवेगळ्या समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न सभागृहात मांडले तर त्याला अधिक बळकटी येईल. यासाठी सर्वांनी मला आग्रह केला आणि मीदेखील त्यांच्या विनंतीला मान देऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
विनोद पाटील यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लोकसभेचं तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले, माझी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्याबरोबर अशी राजकीय चर्चा जालू होती. त्या चर्चेवेळी इतरही मान्यवर तिथे उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी मला विचारलं होतं की तुझं निवडणुकीचं काय? त्यावर मी त्यांना म्हटलं आत्ता तरी काही नाही. आरक्षणाचा विषय मिटल्यावर मी लोकसभा निवडणूक लढवेन. विनोद पाटील यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी आगामी निवडणूक लढण्याबाबत सविस्तर माहिती दिली.
मराठा आंदोलक म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे चार आमदार आहेत. संभाजीनगरमध्ये गेल्या २५ ते ३० वर्षांपासून धनुष्यबणाला मतदान करण्याची परंपरा आहे. इथला हिंदू धर्मीय नागरिक परंपरेने शिवसेनेला मतदान करतो. इथल्या हिंदूंसाठी दुसर कुठलंच चिन्ह नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की, महायुतीत छत्रपती संभाजीनगरची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटेल. ही जागा शिंदेंना सुटली आणि त्यांना वाटलं तर ते मला आशीर्वाद देतील. त्यांना मी योग्य उेदवार वाटलो तर ते मला उमेदवारी देतील.
एकनाथ शिंदेंकडे पर्याय नाही?
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर संयुक्त शिवसेनेतील ४० आमदार आणि १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले आहेत. तर १५ आमदार आणि ५ खासदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे (आधीचं नाव औरंगाबाद) माजी खासदार चंद्रकांत खैरे हेदेखील ठाकरे गटात आहेत. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी मागील निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला होता. परंतु, खैरे आता ठाकरे गटात असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्याच्या घडीला या मतदारसंघात तगडा उमेदवार नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदे विनोद पाटील यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत, असं बोललं जात आहे.