राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उपरती; महाराष्ट्राची मागितली माफी
मुंबई, १ ऑगस्ट २०२२: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला होता. राजस्थानी आणि गुजराती लोक निघून गेल्यास मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीका केली होती. तर आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने हात वर केले होते. यावर राज्यपालांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. तरीही यावर समाधान न झाल्याने काही पक्षांकडून राज्यपालांविरोधात आंदोलन सुरुच होतं. यावर आता पुन्हा एक राज्यपालांनी एका निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणतायेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी?
शुक्रवारी 29 जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे निवेदन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध केले आहे.
मनसे कार्यकर्त्याचा थेट राज्यपालांना फोन, ‘त्या’ वक्तव्यावर विचारला जाब.. कथित ऑडिओ क्लिपने खळबळ
काय होतं प्रकरण?
मुंबईतील अंधेरी येथील या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी गुजराती, राजस्थानी समाजाचं कौतुक केलं होतं. यावेळी मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात गुजराती, राजस्थानी लोकांचं योगदान असल्याचं कोश्यारी म्हणाले. राजस्थानी मारवाडी समाज केवळ धनसंचय न करता शाळा, महाविद्यालये काढून गोरगरीबांची सेवा देखील करत असतो. प्रामुख्याने यात मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात गुजराती आणि राजस्थानी समाजाचं योगदान आहे. जर गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असंही ते म्हणाले होते.