पुढच्या अधिवेशनापर्यंत विरोधी पक्षनेताच आमच्यात असेल : बावनकुळे यांचा खळबळजनक दावा
मुंबई, २१ जुलै २०२३: विरोधकांसमोर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तीन व्हिजन असलेले नेते आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षात नेतृत्व कोण करेल याचीही परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे संशयाचं वातावरण आहे. आजपासून एक वर्षाच्या काळात कोण कुठं जाईल त्या संशयाच्या वातावरणात विरोधी पक्ष हतबल झाला आहे. आता तर संशय इतका बळावला आहे की ते रोज पाहत असतात की आज कोणाचा भाजपात प्रवेश होतोय.
एकनाथ शिंदेंकडे कुणी जाईल का किंवा अजितदादा आणखी चार पाच काढून नेतील का अशी भीती त्यांना आहे. त्यामुळे नागपूरमधील पुढल्या अधिवेशनापर्यंत रााहिलेल्या 78 आमदारांपैकी किती तिकडे राहतील याची शंकाच आहे. माझा डोळा कुणावरच नाही पण ज्या पद्धतीने त्यांच्यात संशयाचे वातावरण सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षातले खूप लोक इकडे आलेले तुम्हाला दिसतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, काँग्रेस पार्टीचं आयुष्य, त्यांचा विचार आणि त्यांची स्थिती ही अशीच आहे. जनतेला कन्फ्युज करून मतांचे राजकारण करणे. जनतेची सेवा करून काँग्रेसने कधीच आपला पक्ष वाढवला नाही. काँग्रेसने अनेक वर्षे राज्य केले. त्यांनी कायमच लोकांना गोंधळात टाकून त्यांचं मतदान घेतलं आहे. कोणत्याही घटनेचे राजकारण करणे. काँग्रेस पार्टी इर्शाळवाडीत का जाऊ शकली नाही. त्यांनीही सेवा कार्य करायला पाहिजे होते.
विरोधी पक्षनेता इतक्यात ठरणार नाही
संशयाच्या वातावरणात विरोधी पक्षनेता ठरू शकत नाही. कुणावर कुणाचा विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत विश्वासाचं वातावरण होत नाही तोपर्यंत विरोधी पक्षनेता ठरेल असं मला वाटत नाही. कारण अनेकांना अशी भीती आहे की जो विरोधी पक्षनेता होतो तो सरकारी पक्षात उडी मारतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता कुणाला करायचं. एकदा त्यांच्या सगळ्यांचा ब्लड ग्रुप चेक करावा लागेल. तो झाल्यानंतर वर्ष दोन वर्षानंतर ते काहीतरी निर्णय घेतील, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षांना लगावला.
काँग्रेसची स्थिती आज अशी आहे की त्यांचे सगळेच नेते आणि विधीमंडळातील सहकारी संभ्रमावस्थेत आहेत. संशयाचं वातावरण आहे. कोण कुठं कधी जाईल याची गॅरंटी कुणालाच नाही असं वातावरण सभागृहात आहे. त्यामुळे ते सभागृहात चर्चाही करत नाहीत. त्यांच्यात कुणाचाच ताळमेळ नाही. विधानसभेतले जे काही चार पाच नेते आहेत त्यांच्यातही संवाद नाही.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप