लातूरचा खासदार ५१% मतांनी निवडून येणार – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
लातूर, ०५/१२/२०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेत विश्वास निर्माण झाला आहे. देशाला आत्मनिर्भर करण्याची गॅरंटी मोदींनी घेतली आहे. या गॅरेटीला महाराष्ट्रातील महायुती सरकारची जोड मिळाली असून आगामी लोकसभा निवडणुकीत लातूरचा खासदार महायुतीचाच असेल व तो ५१ टक्के मतांनी निवडून येईल, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. लातूर जिल्ह्यातील भाजपा सुपर वॉरियर्स या विजयाचे शिल्पकार ठरतील.
लातूर लोकसभा मतदारसंघ प्रवासात त्यांनी अहमदपूर येथे लोहा, उदगीर व अहमदपूर आणि लातूर येथे लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि निलंगा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स तथा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. यावेळी केवळ विजय नव्हे तर महाविजय साकारायचा आहे. हा निर्धार करूनच मी राज्यभरात दौरा करीत आहे. तीन राज्यात भाजपाने मिळविलेला विजय हा विजयाची गॅरंटी देणारा आहे. भाजपा सरकारच्या योजना अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी दररोज तीन तास संपर्क करावा असे आवाहन बावनकुळे यांनी सुपर वॉरियर्संना केले.
या प्रवासात त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, खा. सुधाकर श्रृंगारे, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यु पवार, आ. रमेश आप्पा कराड, लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख,माजी आमदार सुधाकरराव भालेराव, प्रदेश सचिव किरण पाटील, अरविंदजी पाटील निलंगेकर, भाजपा भटके विमुक्त जाती प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष राहुल केंद्रे, सिद्धेश्वर पवार यांच्यासह पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बावनकुळे असेही म्हणाले
• विधानसभा अधिवेशन सुरू होणार आहे, येथील समस्यांची निवेदने स्वीकारणार आहेत. दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करून सरकारने लातूरला न्याय मिळावा अशी माझी भूमिका व जबाबदारी आहे. पक्षाचा अध्यक्ष म्हणून मांडणी करेल.
• २०२४ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे भाजपाच्या कार्यकर्त्याला वाटते. प्रत्येक कार्यकर्त्याला आपापल्या पक्षातीलच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, त्यात गैर काहीच नाही.
• महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्याच्या अधिकार मला नाहीत. निर्णय घेण्याच्या अधिकार हे केंद्रीय पार्लमेंट बोर्ड आणि आमचे वरिष्ठ नेत्यांना आहे. तिन्ही पक्षाचे लोक एकत्र येतील व निर्णय घेतील.