“कामाख्या देवी पापी लोकांना माफ करणार नाही” – विनायक राऊत यांची शिंदे गटावर टीका

मुंबई, १ डिसेंबर २०२२ः शिंदे गटाचे आमदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेल्या नंतर ठाकरे गटावर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आजही कामाख्या देवीच्या दर्शनावरून खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करताना त्यांनी कामाख्या देवी ही जागरूक देवी आहे. त्यामुळे ही देवी पापी लोकांना माफ करणार नाही अशी बोचरी टीका विनायक राऊत यांनी त्यांच्यावर केली आहे.

त्यांच्या पापाचे घडे भरले की या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून ही देवी त्यांना शिक्षा देईल अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलेली याचिका ही सत्याच्या बाजूची याचिका आहे. त्यामुळे या निकालाकडे आम्ही आशेने बघत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार विनायक राऊत यांना शिंदे गटाच्या भविष्यातील राजकारणाकडे कसे पाहता असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, शिंदे गटाची दखल घेण्याची आम्हाला गरज नाही. शिंदे गटाचा शेवट आम्हाला माहिती आहे.

त्यामुळे आमची खरी लढाई ही उद्दाम भाजप बरोबर असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. तर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याविषयी बोलतानाही त्यांनी सांगितले की, जे नेते अनेक घरं फिरून शिवसेनेत आले आहेत.

त्यांना शिवसेनेने भरभरून दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा शिवसेना संपवण्याच्या मार्गावर कोणी लागू नये. जे शिवसेना संपवायच्या मार्गावर लागतील त्यांना शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाही अशा इशाराही विनायक राऊत यांनी उदय सामंत यांना दिला आहे.