अजित पवारांच्या नावाने घोषणा दिल्याने जयंत पाटील संतापले

अकोले, २६ सप्टेंबर २०२४ः व्यासपीठावर भाषण करण्यासाठी उभं राहताच कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाने घोषणा दिल्याने जयंत पाटील संतापल्याचं बघायला मिळालं आहे. त्यानंतर जयंत पाटील यांनीही कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावलं. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अकोले येथे आयोजित मेळाव्यात हा प्रकार घडला. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात करण्यात आली. या यात्रेंतर्गत आज अहमदनगरमधील आकोले येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) प्रदेश अध्यक्ष जयंत पाटीलदेखील उपस्थित होते. यादरम्यान, जयंत पाटील हे भाषण देण्यासाठी व्यासपीठावर उभे राहिले. मात्र, त्यावेळी काही उत्साही कार्यकर्तांनी थेट अजित पवारांच्या नावाने घोषणा दिल्या.

घोषणा ऐकताच जयंत पाटील चांगलेच संतापले. घोषणा देणारा कोण आहे? त्याने हात वर करा, असं ते म्हणाले. तसेच मी याठिकाणी भाषण करणार नाही, असं म्हणत त्यांनी तिथून काढता पाय घेतला. मात्र, त्यानंतर स्थानिक नेत्यांनी त्यांची समजूत काढली आणि जयंत पाटील यांनी पुन्हा भाषण करण्यास सुरुवात केली. “असा पोरकटपणा करणार असाल, तर मी भाषण करणार नाही. इथे सगळ्यांची भाषणं झाली आहेत. मला भाषण करण्यात रस नाही. मला पुढचेही कार्यक्रम आहेत. मी लगेच जातो”, असं म्हणत त्यांनी थेट कार्यकर्त्यांनाच सुनावलं.

जागावाटपावरही केलं भाष्य
दरम्यान, यावेळी काही कार्यकर्त्यांनी उमेदवार घोषित करण्याची मागणीही जयंत पाटलांकडे केली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “महाविकास आघाडीचे जागावाटप सुरू आहे. राज्यात २८८ मतदारसंघ आहेत. त्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो. १ तारखेला जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर आपल्या वाट्याला जे मतदारसंघ येतील तिथे उमेदवार जाहीर केली जातील. मी जर असे उमेदवार घोषित करायला गेलो. तर महाविकास आघाडीत दोन मित्रपक्ष आहेत, ते आक्षेप घेतील. त्यामुळे काहीतरी तारतम्य बाळगायला पाहिजे, कारण आपल्याला आघाडी टिकवायची आहे” तसेच “या मतदारसंघात कुणाला उभे करणार, हे जर तुला कळलं नसेल, तर तुझ्यासारखा येडा दुनियेत माणूस नाही मग”, असे ते म्हणाले.