जरांगे यांची तब्येत नाजूक, आंतरवाली सराटीमध्ये जमला लोखांचा समुदाय
आंतरवाली सराटी, ३० ऑक्टोबर २०२३: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे व ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे लाखो लोक सराटी येथे जमा झाले आहेत. त्यामुळे वातावरणात तणव निर्माण झाला आहे. येथे जमलेल्या महिला, पुरुषांना जरांगे यांची तब्येत बघून रडू कोसळत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज (३० ऑक्टोबर) सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय आपण पाणी, उपचार काहीही घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमधून एक महिला आंदोलक आपल्या आजारी मुलासह अंतरवाली सराटी येथे आल्या आणि जरांगेंची प्रकृती पाहून हंबरडा फोडला. यावेळी त्यांनी जरांगेंना काही झाल्यास मी विष पिऊन जीव देऊन, असा इशाराही दिला.
महिला आंदोलक म्हणाल्या, “आरक्षण मिळेल, पण मनोज जरांगेंची एक एक पेशी तुटून ते मरायला लागले आहेत. त्यामुळे आत्ता त्यांना उपचाराची गरज आहे. आपण आज ना उद्या सरकारकडून आरक्षण घेणारच आहोत. परंतु आता आपण बघ्याची भूमिका घेणं म्हणजे आपला अतिशय नालायकपणा आहे, अतिशय मुर्खपणा आहे. आपण मनोज जरांगेंचा जीव गेल्यावर आरक्षण घ्यायचं का?”
“आरक्षण बघण्यासाठी मनोज जरांगे जीवंत पाहिजे. त्यांनी तपासणीसाठी आणि उपचारासाठी नकार दिला आहे. मात्र, ते आपल्यासमोर जीव देत असतील, तडफडून मरत असतील, तर आपण सर्व बांधवांनी आणि शासनाने ते कसे तडफडून मरत आहेत हे बघायचं का? सरकारला तर त्यांचा जीवच घ्यायचा आहे हे स्पष्ट झालं आहे,” असा आरोप या महिला आंदोलकाने केला.
या महिला आंदोलक पुढे म्हणाल्या, “सरकारला वेळ देऊनही त्यांनी काहीच केलं नाही. ४० दिवसात सरकारने काही प्रयत्न केल्याचं ऐकलं आहे का? विधीमंडळात बैठक घेतली नाही, केंद्रात बैठक घेतली नाही. यांना फक्त पुराव्यांच्या आधारे संसदेत आणि विधीमंडळात विधेयक पारित करायचं होतं. त्यांनी ते केलं नाही. म्हणजे त्यांना माझ्या भावाचा जीव धोक्यात टाकायचा होता.”
“मी माझ्या भावाला असं बघू शकत नाही. तुम्ही प्लिज माझ्या भावाचा जीव वाचवा, अन्यथा मी विष पिऊन मरेन. त्यांना दवाखान्यात घेऊन जा. त्यांची तब्येत खूप गंभीर होत आहे. मी खूप रुग्ण हाताळले आहेत. मला माहिती आहे. त्यांच्यात अजिबात त्राण राहिलेले नाही. ते हात हलवत आहेत, पाय हलवत आहेत, बोलत आहेत म्हणजे त्यावरून तुम्ही असं समजू नका की त्यांची तब्येत चांगली आहे,” अशी माहिती या आरोग्यसेविका असलेल्या महिला आंदोलकाने दिल्या.
“त्यांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. त्या गुठळ्या कधीही त्यांच्या मेंदूत किंवा हृदयात अडकून माझ्या भावाचं काहीही होऊ शकतं. त्यामुळे या स्थितीत मला माझा भाऊ महत्त्वाचा आहे. ते उपचार घेत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मी जीव देईन. माझ्या भावावर उपचार केल्याशिवाय मी जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
“प्लिज मला भेटू द्या, मी त्यांच्याशी बोलते. मला त्यांच्या पाया पडू द्या. आपण त्यांना उचलून नेऊ, आयसीयूत दाखल करू,” असंही त्यांनी नमूद केलं.