जगदीश मुळीक यांनी फडणवीसांनाच घरचा आहेर दिला : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा टीका

पुणे, २६ ऑगस्ट २०२२ : भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पुणेकरांची मिळकत कराची सवलत ही महाविकास आघाडी सरकारमुळे गेली,अश्या प्रकारचा खोटा आरोप केला.

हा आरोपच खोटा व हास्यास्पद आहे.मुळात जगदीश मुळीक हे २०१४ ते १९ या काळात पुणे शहरातील वडगांव शेरी विधानसभेचे आमदार होते.सध्या ते पुणे शहर भाजपचे अध्यक्ष आहेत.यांच्या अध्यक्ष पदाच्या काळातच भाजप पुणे महानगरपालिकेत सत्तेत होती.परंतु पुणे महानगरपालिकेच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत जगदीश मुळीक यांना फारसे महत्व दिले जात नव्हते त्यामुळेच कुठले निर्णय कधी झाले याबाबतचे ज्ञान जगदीश मुळीक यांना नसेल हे मी समजू शकतो, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

२०१४ ते १९ या पाच वर्षात जगदीश मुळीक हे आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्ट २०१९ रोजी पुणे शहरातील मालमत्ताधारकांना मिळणारी सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला.ही सवलत १९७० सालापासून ते २०१९ पर्यंत पुणेकरांना मिळत होती,ही वस्तुस्थिती माहीत असूनही २०१९ ला हा निर्णय घेण्यात आला अर्थात त्यावेळेस राज्यात फडणवीस सरकार सत्तेत होते.हा निर्णय झाल्यानंतर स्वतःआमदार जगदीश मुळीक व पुणेकरांच्या जीवावर निवडून आलेले भाजपचे १०० नगरसेवक यांनी कुठलीही तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली नाही.त्याचा भुर्दंड आज प्रत्येक पुणेकरास सहन करावा लागत आहे. जर यांना पुणेकरांची काळजी असती तर जगदीश मुळीक यांनी त्याच वेळी तत्कालीन राज्य सरकारकडे तक्रार केली असती ,किंबहुना राज्यातील नेतृत्वाकडे याबाबतची विचारणा मुळीक यांनी केली नाही अर्थात त्यांच्यात ती धमक ही नाही.ही वस्तुस्थिती जगदीश मुळीक लपवून ठेवत आहेत.

 

मागच्या २ महिन्यापूर्वी राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर जगदीश मुळीक अथवा पुणे भाजप मधील कुणीही अश्या प्रकारची मागणी केली नाही.किंबहुना आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रभाग रचना बदलावी अशी मागणी करण्यासाठी जगदीश मुळीक यांना वेळ आहे.परंतु पुणेकरांना कर सवलत मिळावी ही मागणी करायला मुळीक यांच्याकडे वेळ नाही. मला खात्री आहे की ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर पुणेकर येणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच या गोष्टीसाठी धडा शिकवतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेकरांना ही करसवलत मिळवण्यासाठी मोठे जनआंदोलन येत्या काळात उभारणार असून,पुणेकरांची करसवलत जरी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी रद्द केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेकरांना पुन्हा ही कर सवलत मिळवून देणार हा शब्द मी या निमित्ताने देऊ इच्छितो, असे जगताप यांनी सांगितले.