कोल्हापूर मध्ये हसन मुश्रीफ सोडून कोणी दुसरे आहे का? अजित पवार यांच्या प्रश्नानंतर पदाधिकाऱ्यांची बोलती बंद

कोल्हापूर, ३१ मे २०२३: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरमधून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना रिंगणात उतरविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले. मागील ३ निवडणुकांमध्ये बाहेरुन आलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पक्षात काम करणाऱ्या उमेदवारालाच तिकीट द्यावे, कोल्हापूरसाठी आपल्याकडे तगडे उमेदवार आहेत, असे विविध दावे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पवारांपुढे केले. मात्र ईडीचा चौकशीचा मागे लागलेल्या यांना उमेदवारी दिल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे अजित पवार यांनी मुश्रीफ सोडून दुसरा कोणी इच्छुक आहे का? असा थेट प्रश्न पदाधिकाऱ्यांना केला त्यावेळी बैठकीमध्ये सन्नाटा पसरला.

अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आली आहे. यात मतदारसंघाचा आढावा, पक्षाची ताकद वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, उमेदवारांची चाचपणी, जागावाटप अशा टप्प्यांवर तयारी सुरु आहे.

महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा शिवसेना कडे आहे. कोल्हापूरच्या जागेचे शिवसेनेसाठी एक वेगळे महत्व आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून कोल्हापूर आणि हातकणंगलेची जागा शिवसेना लढविते. इतकचं नाही तर शिवसेनेच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवातच अंबाबाईच्या आशीर्वादाने कोल्हापूरमधून होते.

मात्र आता ही जागा ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीकडे घ्यावी अशी मागणी या बैठकीत राष्ट्रवादीच्या कोल्हापूरमधील नेत्यांनी केली. राष्ट्रवादीकडे इथून हसन मुश्रीफ, व्ही. बी. पाटील, के. पी. पाटील, संजय घाटगे, अरुण डोंगळे असे तगडे उमेदवार आहेत. यातही हसन मुश्रीफ यांचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी नेत्यांनी यावेळी केली. परंतु यावेळी मुश्रीफ यांनी आपण अजून एक विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान, कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांचा मुश्रीफ आग्रह बघून आणि मुश्रीफ यांनी नकार दिल्यानंतर अजित पवार यांनी थेट मुश्रीफ नसतील तर तुमच्याकडे कोण उमेदवार आहे, अशी विचारणा केली. पवार यांच्या या प्रश्नानंतर बैठकीमध्ये काहीशी शांतता पसरली. यावर उमेदवार आहेत पण शिवसेनेत आहेत, असे म्हणतं अप्रत्यक्षपणे संजय घाटगे यांचे नाव सुचित करण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय व्ही. बी. पाटील हे देखील चांगला पर्याय ठरु शकतो, असे सुचविण्यात आले. पाटील यांना छत्रपती घराण्याचेही पाठबळ मिळू शकते असे आडाखे बांधले जात आहेत.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप