“मुख्यमंत्र्यांचा भूखंड घोटाळा हा लवंगी फटाका आहे का..?” – राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

नागपूर, २७ डिसेंबर २०२२: माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. या बॉम्बच्या वातीही काढलेल्या आहेत. फक्त त्या वाती पेटवायचा अवकाश आहे. योग्यवेळी बॉम्ब फोडणार असा सूचक इशारा दिला होता. यानंतर फडणवीसांनी देखील ठाकरेंना आतापर्यंत तरी ते जे बॉम्ब म्हणत आहेत. ते लवंगी फटाके देखील नाहीयेत. आमच्याकडे खूप बॉम्ब आहेत. कधी काढायचे ते ठरवू असं प्रत्युत्तर दिले आहेत. त्यावर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांनी फडणवीसांच्या टीकेवर पलटवार केला.

संजय राऊतांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंचा भूखंड घोटाळा हा काय लवंगी फटाका आहे का? अब्दुल सत्तारांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घेतला आहे. हा लवंगी फटाका आहे का? या घोटाळ्यात कोट्यवधींचा व्यवहार झाला. कृषी महोत्सवासाठी काही कोटींची ठेकेदारी दिली पैसे गोळा करायला, हा काय लवंगी फटाका आहे का? एनआयटीचे १६ भूखंड वाटले गेले, विरोधी पक्षानं हा बॉम्ब फोडला, हा काय लवंगी फटाका झाला का? गेल्या तीन दिवसांत आम्ही भूखंडांचे दोन मोठे घोटाळे बाहेर काढले. ते काय लवंगी फटाके आहेत का? अजून अधिवेशन संपलेलं नाही. यापुढेही बाँब फोडत राहणार आहोत असे देखील राऊतांनी यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीस कधीकाळी विरोधीपक्षात होते. तेव्हा त्यांनी विधानसभेचा वापर हा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला. तसेच एकनाथ खडसे असतील, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या इतर सहकार्यांनी त्याकाळी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आणली. मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी दटून राहिले. पण आज सत्तेत असताना त्यांना विरोधी पक्ष काढत असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणं बॉम्ब न वाटता लवंगी फटाकेही वाटत नाहीत. फडणवीस तुम्ही एवढे बदलला आहात का? तसेच फडणवीसांबद्दल आम्हांला सहानुभूती आहे. तसेच त्यांच्याकडून बर्याच अपेक्षा सुध्दा आहेत असाही टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहेत.

मुक्ता टिळकांच्या निधनानंतर पाचव्याच दिवशी राष्ट्रवादीच्या रूपाली पाटलांना आमदारकीचे वेध

टीका करण्याआधी फडणवीस यांनी घोटाळेबाजांवर कारवाई करावी. सत्तेत बसल्यावर फटाके देखील बाँम्ब वाटू लागतात. त्यामुळे टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक पातळी सांभाळावी. भ्रष्टचारी मंत्र्यांना पाठीशी घालणं यात फडणवीस यांची मजबुरी आहेत. पण फडणवीस हे भ्रष्टमंत्र्यांचं ओझं घेऊन जास्त दिवस सरकार चालवू शकत नाही असेही राऊत यावेळी सांगितले.

हा कसला ठराव…

सीमावादाचा प्रश्न आमच्यासाठी मह्त्वाचा आहे. सरकारने ज्या प्रकारचा ठराव तयार केलाय, तो अत्यंत बुळचट आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा या मुद्द्याचा ठरावात उल्लेखही नाही. हा कसला ठराव, हा तर बेडकांचा डराव आहे असा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे.

फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, विरोधकांचे आरोप म्हणजे शूट अँड स्कूट अशी नीती आहे. कुठलंही प्रकरण उकरून काढायचं. त्यावरून गोंधळ घालायचा. त्यांच्या आरोपाला आम्ही उत्तर दिले तर ते ऐकून घ्यायचं नाही. अशा प्रकारे ठाकरे गटाचा प्रयत्न दिसत आहेत. मात्र, आतापर्यंत ते जे बॉम्ब म्हणत आहेत. ते लवंगी फटाके देखील नाहीयेत.पण आमच्याकडे खूप बॉम्ब आहेत. आणि ते कधी काढायचे ठरवू. पण सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत ते आम्ही बघत आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.