भाजपची सत्ता असूनही हंडा मोर्चा काढण्याची नामुष्की

पुणे, ७ जानेवारी २०२३ ः कोथरूड, शिवाजीनगर मतदारसंघात राज्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार असले तरीही त्यांच्या भागात पाणी मिळत नसल्याने आता थेट हंडा मोर्चा काढण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय व विश्‍वासू भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या एरंडवणे, नळ स्टॉप चौक परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रयत्नात आहेत. पण प्रशासाने त्यांना दाद दिलेली नाही. त्यांच्या भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ७२ तासात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर याविरोधात हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा खर्डेकर यांनी दिला आहे. यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांना प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी निवेदन दिले आहे.

नळस्टॉप, सहकार वसाहत, पंडित नेहरू वसाहत,दहा चाळ, गणेशनगर, एरंडवणे परिसरातील नागरिक कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता ‘एसएनडीटी’ टाकीची पातळी कमी राखली जात नसल्याने व एलअँडटी कंपनीने ६ इंचाची जलवाहिनी जोडणीचे काम पूर्ण न केल्याने पाणी कमी दाबाने व कमी वेळ येत असल्याचे सांगितले. यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी हा प्रश्‍न त्वरित सोडविण्याचे मान्य केले होते. पण मात्र अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.त्यामुळे येत्या ७२ तासात पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा खर्डेकर यांनी केला. आहे.

तसेच समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मीटर बसविल्यानंतर “तुम्ही जादा पाणी वापर करत आहात व तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल अशा स्वरूपाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. याबाबत पावसकर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार नागरिकांना आवाहन देखील केले आहे. मात्र नागरिकांना घाबरविण्याऐवजी त्यांच्या लोकशिक्षणासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणीही खर्डेकर यांनी केली आहे.