अहमदनगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाच्या वाटेवर; काँग्रेसला मोठा धक्का

अहमदनगर, ८ फेब्रुवारी २०२४ : जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राजेंद्र नागवडे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनीही महिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. येत्या काही दिवसांतच नागवडे दाम्पत्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. श्रीगोंदा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

राजकारणात गॉडफादर हवा असतो. अजित पवार यांनी पाठबळ देण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे. त्यांच्या पाठबळावरच आपण ही भूमिका घेतली आहे. येत्या २० फेब्रुवारीला हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मागील काही महिन्यांपासून अनुराधा नागवडे या विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. त्यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींकडे इच्छाही व्यक्त केली होती. मात्र श्रीगोंदा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे असल्याने त्यांना उमेदवारी मिळणे शक्य नव्हते. पण काहीही झाले तरी यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार नागवडे यांनी केला होता. त्यामुळेच राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग निवडला असल्याचे बोलले जात आहे. मात्र श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. भाजपचे बबनराव पाचपुते तिथून आमदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतूनही उमेदवारी मिळो अथवा नाही मिळो पण आपण निवडणूक लढवणारच असे नागवडे यांनी जाहीर केले आहे.

आगामी राजकीय वाटचाली बाबतची दिशा ठरवण्यासाठी राजेंद्र नागवडे यांनी नुकतीच श्रीगोंद्यामध्ये समर्थकांची एक बैठक घेतली होती. यात आपण राष्ट्रवादी प्रवेशाबाबत समर्थकांकडून मत जाणून घेण्यात आले. तसेच गेल्या दोन निवडणुकांमध्ये इतरांना मदत करत त्यांना आमदार होण्यास मदत केली. मात्र आता जनतेच्या प्रश्नासाठी आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी अनुराधा नागवडे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर नागवडे पती-पत्नींनी आपले राजीनामे काँग्रेस श्रेष्ठींकडे सुपूर्त केले.