uddhav Thackeray

हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या – उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

मुंबई, ५ डिसेंबर २०२३: “तुमच्यात हिंमत आणि आत्मविश्वास असेल, तर लोकसभेची निवडणूक देशभर बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवावी. नाही, तर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा,” असं आव्हान ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं आहे. विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या यशावर यानिमित्ताने ठाकरे यांनी संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरामच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाला भरघोश यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे. तसेच, मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या ‘शिवालय’ कार्यालयाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “राजस्थान, छत्तीगसड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा. एवढी तुमची लाट असेल, तर लोकसभेची एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. आमच्याही मनात काही शंका नको. सगळं वातावारण विरोधात आहे. एक्झिट पोल आणि उलटेपालटे करणारे निकाल लागत आहेत. मग, हे कसं घडलं? हा प्रश्न मतदारांना पडत असेल. ती शंका दूर करण्यासाठी एकच निवडणूक दम असेल, तर बॅलेट पेपरवर घ्या.”
“बॅलेट पेपरची मतमोजणी करण्यासाठी वेळ लागतो. लोकशाही आणि देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीला मतमोजणीसाठी दोन-तीन दिवस लागले, तर काय फरक पडतो. महापालिका निवडणूक एक-दोन वर्ष झालं पुढं ढकलण्यात आली आहे. त्यात वेळ जात नाही का?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.