आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर नागडं करून मारू – भाजपच्या राम सातपुतेंचं आक्रमक भाषण

मरकडवाडी, ११ डिसेंबर २०२४ : रणजितसिंह मोहिते पाटील थोडी जरी लाज शिल्लक असेल तरी राजीनामा द्या. कारण तुम्ही भाजपविरोधात काम केलं. गद्दारांना माफी नको हे फडणवीस साहेबांना सांगा. व्हाट्सअपवर गोष्टी टाकणं बंद करा. राम सातपुते चांगल्या चांगल्यांना घोडा लावून इथपर्यंत पोहोचलाय. आमच्या कार्यकर्त्याला मारलं, जर आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर मी धमकी देणार नाही भर चौकात नागडं करून मारू, अशी धमकीच भाजपच्या राम सातपुतेंनी मारकडवाडीतील सभेत दिली. मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू असंही ते म्हणालेत.

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मरकडवाडी येथे हजेरी लावल्यानंतर आता मरकडवाडीत आज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी भिडणार आहेत. दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे पवारांच्या सभेला उत्तर देत असून भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन दाखवले आहे.

राम सातपुते म्हणाले, मारकडवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे. मोहिते पाटलांची गुलामी हे गाव कधीही सहन करणार नाही. जानकरचे चार लोक म्हणजे गाव होत नाही. यांनी कितीही खोटे नॅरिटीव करू द्या. मी शंभर टक्के सांगतो कारण मला माझ्या कर्तुत्वावर विश्वास आहे. गोपी शेठ २०२९ ला शंभर टक्के गुलाल आपला असेल. जिथे कमी पडलो तिथे काम करेल. 2029 ला गुलाल नाही मिळाला तर राजकारण सोडणार असं राम सातपुते म्हणालेत. मारकडवाडीच्या इव्हेंटचा मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे. त्या विरोधात ही सभा आहे असंही ते म्हणालेत.

मी फडणवीस साहेबांना सांगितलंय गद्दारांना माफी करायची नाही. रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी झाली नाही तर पक्षातील कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून गद्दाराची हकलपट्टी करा असं पत्र पाठवतील. आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलं. अकलूजमधील आपल्या मनोज साळुंखेंना मोहित्यांच्या गुंडाने बुथवर उभा राहिला म्हणून मारलंय. माळशिरसची निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू असं म्हणत भाजपनेते राम सातपूतेंनी रणजीतसिंह मोहिते पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक विरोधात काम केले आणि आता भाजप नेत्यांचे पाय धरत आहेत. रणजीत सिंह मोहिते पाटील यांना थोडी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. असं राम सातपुते म्हणाले.