अजित पवारांकडे १४५ चे बहुमत असेल तर मुख्यमंत्री व्हावे – नाना पटोले यांचा टोला
मुंबई, २२ एप्रिल २०२३: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठा दावा केला होता. आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्यासाठी मला आत्तापासूनच मुख्यमंत्री झाल्याचे आवडले असे म्हणाले. पण राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री करण्याइतपत संख्याबळ नसल्याने त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना
अजित पवारांकडे १४५ चे बहुमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, सारख मी मुख्यमंत्री बनतो असे म्हणण्याची गरज नाही, असा टोला लगावला.
पुण्यात दैनिक सकाळ तर्फे आयोजित मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्री होण्यास आवडले असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. काँग्रेसने अजित पवार यांच्या मुद्द्यापेक्षा राज्यातील इतर प्रश्न महत्वाचे आहेत असे सांगत त्यास महत्व दिले नाही.
नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले, “अजित पवारांकडे १४५ आमदार असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. सारखं मी मुख्यमंत्री बनतो, असं म्हणायची काहीही गरज नाही. खरं तर आज राज्यात अनेक प्रश्न आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. खारघरमध्ये श्रीसेवकांचा मृत्यू झाला. महागाईमुळे जनता परेशान आहे. बेरोजगारी वाढत आहे, त्यामुळे अशा राजकीय विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
“दोन दिवसांपूर्वी अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगितलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा ते पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे माध्यमांनाही यातलं किती माहिती हे त्यांनाच माहिती”, असेही ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाणांबाबत केलेल्या विधानावर दिलं प्रत्युत्तर
दरम्यान, २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार असतानाही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, असं अजित पवार म्हणाले होते. याबाबात नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “अजित पवारांनी त्यावेळी शपतच घ्यायला नको होती. उपमुख्यमंत्री पदावर बसून खदखद निर्माण करण्यापेक्षा बाहेर राहून खदखद व्यक्त करायला हवी होती. मुळात त्यांनी अशा प्रकारचं विधान करावं हे अपेक्षित नाही. त्यांनी केलेलं विधान चुकीचं आहे”, असं ते म्हणाले. तर गौतम अदाणी-शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात भाष्य करण्याचे पटोले यांनी टाळले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप