न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगून माझी झोपेत सही घेतली – मनोज जरांगे पाटील यांचा गौप्यस्फोट
लोणावळा, २५ जानेवारी २०२४: न्यायालयाचा कागद सांगून माझी झोपेतच माझी सही घेतली असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटलांनी सही घेणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांना मुंबईतील आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली असून न्यायालयाकडूनही नोटीस बजावण्यात आली आहे. एकूण या प्रकरणी मनोज जरांगे यांच्याकडे एक अधिकारी झोपेतच सही घेऊन गेले असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज जरांगे पाटलांची पदयात्रा मुंबईच्या वेशीवर पोहोचली आहे. अशातच आता पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याने पोलिसांकडून दुसऱ्या मार्गावरुन पदयात्रा घेऊन जाण्याचा अट्टाहास केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुनच माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी झोपेतच सही घेऊन घेल्याचा दावा केला आहे.
तसेच माझ्या सहीचा काही दुरुपयोग झाल्यास माझ्याशी गाठ असल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. सध्या मनोज जरांगे यांची पदयात्रा लोणावळ्याहून वाशीकडे रवाना होत आहे. पोलिसांकडून आता त्यांना मार्ग बदलण्याची विनवणी करण्यात येत आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सकाळी कुणीतरी अधिकारी आला आणि त्याने मला कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा मान सन्मान ठेवतो, त्यामुळे मी लगेच सही केली. त्यात एक मराठी कागद होता आणि एक इंग्रजी कागद होता. पण सकाळी मोर्चाची गडबड असताना, मी झोपेत असताना माझी सही घेतली. माझ्यासह यात इतर नऊ जण असल्याचं सांगत त्यांनी सही घेतली, असल्याचंही जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे यांची पदयात्रा सध्या नवी मुंबईतील वाशीकडे जात असून या मार्गावर एक मोठं रुग्णालय असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या पदयात्रेचा मार्ग दुसऱ्या मार्गाने नेण्यात यावी अशी मनधरणी करण्यात आली आहे.