“मी त्यांना अटकेपासून वाचवलं”, छगन भुजबळांच्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर
मुंबई, ३० ऑगस्ट २०२३: बीडमध्ये अजित पवार गटाची झालेल्या उत्तर सभेत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्र सोडलं. माझी काहीही चूक नसताना, २००३ मध्ये तेलगी प्रकरणात शरद पवारांनी माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला, असा गंभीर आरोप छगन भुजबळांनी केला. यावर आता स्वत: शरद पवार यांनी उत्तर देत, उलट मीच त्यांना अटकेपासून वाचविले आहे असा पलटवार केला.
छगन भुजबळांचा राजीनामा घेतला नसता तर त्यांना अटक झाली असती. मी त्यांना अटकेपासून वाचवलं, अशा आशयाचं विधान शरद पवारांनी केलं आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाव न घेता हे विधान केलं. याबाबतचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.
छगन भुजबळांनी नेमका आरोप काय केला होता?
शरद पवारांना उद्देशून केलेल्या भाषणात छगन भुजबळ म्हणाले, “मी पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष झालो. तेव्हा तुम्ही आणि मीच महाराष्ट्रात दोघेच फिरत होतो. थोडे आमदार कमी पडले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री, तर मी उपमुख्यमंत्री झालो. पण, मला एक कळलं नाही, २३ डिसेंबर २००३ रोजी माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा तुम्ही घेतला. त्यात माझी काय चूक होती?”
“तेलगीला अटक करत त्याच्यावर मोक्का लावण्याचे आदेश मी दिले. तेव्हा तुम्ही मला बोलावलं आणि राजीनामा देण्यास सांगितलं. राजीनामा द्या, असं तुम्ही म्हटलं. नंतर फोन आला भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. तरीही तुम्ही माझा राजीनामा घेतला. १९९२-९३ आणि ९४ साली खैरनार यांनी तुमच्यावरही आरोप केले होते. पण तुमचा राजीनामा कुणीही मागितला नाही. मग माझा राजीनामा का घेतला?” असा संतप्त प्रश्न भुजबळांनी पवारांना विचारला.