“मला नरेंद्र मोदींसोबत जावेच लागेल” – शरद पवारांनी ज्येष्ठ गांधीवादी नेत्याला सांगितले

पुणे, ३१ जुलै २०२३:  एकीकडे देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील समावेश आहे. मात्र दुसरीकडे हेच शरद पवार उद्या पुण्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या शेजारी बसणार आहेत. हे दोन्ही नेते लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी एकत्रित आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. त्यातच ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत माजी आमदार कुमार सप्तऋषी यांनी शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तुम्ही नरेंद्र मोदींसोबत एका व्यासपीठावर बसू नये अशी विनंती केली. त्यावर पवार यांनी “त्या कार्यक्रमाला जाणे माझी अपरिहार्यता आहे. मी आता तसा निर्णय घेऊ शकत नाही”, असे सांगत मोदींसोबत कार्यक्रमाला जाणारच असे पवार यांनी स्पष्ट केले.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरविले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावर असणार आहेत. ‘टिळक पुरस्कारासाठी मी स्वत:च पंतप्रधानांची वेळ मिळवून दिली असल्याने तेथे जाणे हा माझा नाईलाज आहे’ असे खुद्द पवार यांनी सांगितल्याचा दावा युक्रांदचे डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी केला.
मोदी यांना मंगळवारी (१ ऑगस्ट) प्रदान करण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांची मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली.
या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी विनंती करण्यात आली असली तरीही शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्यावर ठाम आहेत. ‘टिळक पुरस्कारासाठी मी स्वत:च पंतप्रधान मोदींची वेळ मिळवून दिली असल्याने, तेथे जाणे हा माझा नाईलाज आहे’ असे पवारांनी मला सांगितल्याचा दावा कुमार सप्तर्षी यांनी केला.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप