शिवसेना वंचितचे काय सुरूय मला माहिती नाही – शरद पवार
कोल्हापुर, २८ जानेवारी २०२३ : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना राष्ट्रवादीने काँग्रेसची महावीर कसा आघाडी केलेली आहे वंचित बहुजन आघाडीशी आमचा काही संबंध नाही त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही आणि शिवसेना आणि वंचित मध्ये काय सुरू आहे याची आम्हालाही कल्पना नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वंचितला बेदखल केले.
पवार हे कोल्हापुर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युती मागच्या आठवड्यात झाल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच असल्याचे म्हटले होते, त्यावर राऊत यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शरद पवारांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे काय चालले आहे, याची माहिती आम्हाला नाही. आम्ही त्या चर्चेत सहभागी नव्हतो, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत, मी असतो तर तेच केलं असतं. असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. याबाबतचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. पण आमचा अनुभव आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे.