“मी ईडीच्या रडारवर नाही तर आणल गेलय” – किशोरी पेडणेकरांची भाजपवर टीका
मुंबई, २४ जून २०२३ ः सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मुंबईतील कथित कोविड घोटाळ्यावरून विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ईडीकडून केला आहे. या आरोपांमुळे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर आल्याचं बोललं जातं आहे. येत्या काळात किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
करोना संसर्गाच्या काळात कोविड उपचारांच्या औषधांची खरेदी वाढीव दरात केली. बॉडी बॅगच्या खरेदीतही घोटाळा झाल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. दोन हजार रुपये किमतीची बॉडी बॅग ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे. किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरूनच हे कंत्राट देण्यात आलं होतं, असा दावा केला जात आहे. महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचा आक्षेप डावलून हे कंत्राट देण्यात आल्याचाही आरोप केला आहे.
ईडीच्या या आरोपानंतर मुंबईच्या माजी महापौर व ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मी ईडीच्या रडारवर नाही, मला ईडीच्या रडारवर आणलं गेलंय, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्या मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
ईडीच्या कारवाईबाबत विचारलं असता किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “ईडी येणार असेल तर त्यांना येऊ द्या. जे नियमाने असेल ते होईल. मी ईडीच्या रडारवर नाही. मला ईडीच्या रडारवर आणलं गेलंय. मी काही केलं असेल तरच मी ईडीला घाबरेल. महापौर हे संविधानिक पद आहे. ते कसं असावं, हे मी दाखवलं आहे. ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने भ्रष्ट पैसा आहे, तो पैसा गोधडीखाली झाकून ठेवला आहे.”