‘मी ब्राह्मण म्हणून मला टार्गेट केलं जातंय’ – देवेंद्र फडणवीस
मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३: मी ब्राह्मण आहे आणि मी माझी जात बदलू शकत नाही. मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी फक्त राजकारण केलं असे लोक मला टार्गेट करतात. त्यांना माहीत आहे की मी सॉफ्ट टार्गेट आहे याला टार्गेट करा अशी मानसिकता त्यांची दिसते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांनी पुणेरी पगडी, पेशवाई असे शब्दांचा उल्लेख करत फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आज फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शरद पवार यांनाच प्रतिउत्तर दिल्याचे बोलले जात आहे.
टिकणारं आरक्षण मी दिलं होतं
एकच आरक्षण हायकोर्टात टिकलं, ते मराठा आरक्षण होतं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात ते चाललं. मी मुख्यमंत्री असेलपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही. सर्वोच्च न्यायालयात नंतर काय घडलं हे सगळ्यांना माहीत आहे. आपले वकील सांगायचे आदेश मिळाला नाही. आपल्या वकिलांनी सांगितलं भरती थांबवतो. काय काय कसं कसं घडलं ते सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा एखाद्या श्रेय देता येत नाही तेव्हा त्याचं श्रेय काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मनोज जरांगे पाटील यांनाही अशाच कुणीतरी हे सांगितलं असावं. मला टार्गेट करण्याचं एकच कारण आहे. १९८० मध्ये आरक्षणासाठीची लढाई सुरु झाली. ८२-८३ मध्ये अण्णासाहेब पाटील यांचा जीव गेला. कायद्याने टिकणारं आरक्षण हे मी दिलं. असं फडणवीस म्हणाले.
मराठा समाजाच्या नावाने ज्या नेत्यांनी राजकारण केलं त्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलं नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मी दिलं होतं. आजवर मराठा समाजासाठी जे लोक काहीही करु शकले नाहीत अशाच लोकांनी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी मी माझी जात बदलू शकत नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की मी ब्राह्मण आहे. मी जात बदलण्याचं कारण नाही. मात्र मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी राजकारण केलं त्यांना वाटतं की मी सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं.
मी जे काम केलं आहे ते लोकांच्या समोर आहे
मी जे केलं आहे ते लोकांच्या समोर आहे. १९८० ते २०१७ ही ३७ वर्षे मराठा समाजाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा नाकर्तेपणाही समोर आला आहे. त्यामुळे ते अधिक आक्रमकतेने मला टार्गेट करण्यासाठी एकत्र येतात. मला कितीही टार्गेट केलं तरीही सामान्य मराठा माणसाला माहीत आहे. मी जातीचं कार्ड कधीही खेळत नाही. पण मला टार्गेट करणाऱ्यांच्या मानसिकता सांगतो आहे. सामान्य माणसाच्या मनात जात नसते. त्याच्या मनात कर्तृत्व असतं. तुम्ही काय काम करता यावर ते तुमचं महत्त्व ठरवत असतात. त्यामुळे काही काळासाठी तुम्ही लोकांची दिशाभूल करु शकता. मला टार्गेट करु शकता पण हे फार काळ टिकत नाही. शिवाय लोक हे त्यांना विचारु शकतात की तुम्ही काय केलंत? असंही फडणवीस म्हणाले.