कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटणार?; आज विधान परिषदेसाठी मतदान
मुंबई, १२ जुलै २०२४ : राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी विधान परिषदेतील ११ रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यासाठी आज मतदान पार पडणार आहे. यामध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटणार यावर महायुती आणि महायुगास आघाडीच्या उमेदवारांचा विजय अवलंबून आहे. ज्या आमदारांना कमी मतदान आहे ते मत विकत घेण्यासाठी घोडेबाजार सुरू झालेला आहे. रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांसह अन्य महत्वाचे नेते या फिल्डिंगमध्ये लागलेले होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि ठाकरे गटाचा एक , अपक्ष एक आणि काँग्रेसचा एक असे बारा उमेदवार उभे आहेत अकरा जागांसाठी १२ उमेदवार आल्याने कोणत्यातरी एका उमेदवाराचा पराभव होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी विजय उमेदवाराला २३ मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेत भाजपचे १०३ आमदार असून त्यांना सात अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपकडे ११० मते आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ४४ मत आहेत. अजित पवार यांच्याकडे ४२ मते आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना मात्र दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजवळ करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत काँग्रेसकडे ३७ ठाकरे गटाकडे १६ आणि शरद पवारांकडे बारा आमदार आहेत. या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची 14 मते शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटाला होऊ शकणार आहे. मात्र काँग्रेसच्या आमदारांची मते फुटून ते महायुतीला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाबा सिद्दिकी आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले आमदार हे महायुतीला मतदान करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विधान परिषद निवडणुकीनंतर फुटला होता ठाकरे गट
राज्यामध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या नंतर शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती. एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन गुवाहाटी ला गेले होते. त्यानंतर राज्यात सत्ता बदल होऊन महायुतीची सत्ता आली. प्रत्येक पक्षाला आमदार सांभाळणे अवघड झाले असून पक्षातील बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी प्रत्येक पक्ष आपला पक्ष भक्कम आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये कोणत्या पक्षाला यश येते हे लागणार आहे.