संजय राऊत अंतर्यामी झालेत का ? शंभूराजे देसाई यांची संजय राऊतांवर टीका
मुंबई, २४ एप्रिल २०२३ : दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला काढण्यासाठी खलबत्ते सुरू असल्याचा दावा शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला. त्यावरून शिंदे गटातील मंत्री शंभूराजे देसाई यांनी राऊत यांच्यावर टीका करत आमच्या महायुतीमध्ये काय सुरू आहे हे राव त्यांना काय माहिती संजय राऊत अंतर्यामी झालेले आहेत का असा प्रश्न उपस्थित करत स्वतःचा ठेवायचा झाकून दुसऱ्याचा बघायचा वाकून असा टोला देसाई यांनी लगावला.
दिल्लीतूनच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचा मोठा दावा केला. यानंतर आता शिंदे गटाकडून राऊतांच्या दाव्यावर पहिली प्रतिक्रिया आली. मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील राऊतांचं वक्तव्य ‘स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’ असं असल्याची टीका केली. ते सोमवारी (२४ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
शंभुराजे देसाई म्हणाले, “मला एक कळत नाही की, संजय राऊत आमच्या महायुतीमध्ये काय सुरू आहे हे कसं सांगू शकतात. संजय राऊत अंतरयामी झाले आहेत का? रोज सकाळी उठायचं, तथ्यहीन बोलायचं. मला त्यांना एकच सांगायचं आहे की, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंबद्दल केलेलं वक्तव्य म्हणजे ‘स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’ असं आहे.”
कालच शरद पवार म्हणाले की, २०२४ मध्ये महाविकासआघाडी एकत्र लढेल की नाही हे सांगू शकत नाही. ज्यांनी मविआ स्थापन केली त्या शरद पवारांनीच हे एवढं मोठं वक्तव्य केलं आहे. यावरून मविआत सगळं आलबेल नाही हे दाखवतं आहे. याबाबत संजय राऊत काही बोलत नाहीत, मात्र त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते असं वक्तव्य करत आहेत,” असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं.
“संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमचा मुख्यमंत्री बदलणार आहे का असं विचारायला गेले आहेत का? आमचं १७० हून अधिक आमदारांचं बहुमत आहे. त्यांना बहुमत सिद्ध करण्याची हौस असेल तर त्यांनी सभागृहाच्या कोणत्याही आयुधाचा वापर करून विश्वासदर्शक चाचणीची मागणी करावी. आम्ही दोनदा १७० चं बहुमत दाखवलं आहे, आता आम्ही १८५ च्या पुढे जाऊ. त्यामुळे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंविषयी अशाप्रकारचं वक्तव्य करण्यात अर्थ नाही.”
“संजय राऊत तथ्यहीन, विनाआधार बोलतात. ते ‘स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहायचं वाकून’ असं वागत आहेत. पवारांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते बोलले नाहीत, मात्र विश्व प्रवक्ते म्हणाले की, शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. राऊत राष्ट्रवादीच्या भूमिकेवर का बोलत आहेत. त्यावर शरद पवार किंवा राष्ट्रवादीचे नेते सांगतील,” असं प्रत्युत्तर देसाई यांनी राऊतांना दिलं.