महायुतीसाठी गोड बातमी, भाजप बनणार सर्वात मोठा पक्ष

मुंबई, १२ सप्टेंबर २०२४: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे घमासान सुरू झाले आहे. महविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार याचं उत्तर निकालानंतर मिळेलच पण आतापासूनच विजयाचे दावे केले जात आहेत. यातच काही ओपिनियन पोल सुद्धा समोर आले आहेत. काही ओपीनियन पोल मध्ये महायुती हारणार असा निष्कर्ष काढला गेला होता. पण आता टाइम्स नाऊच्या ताज्या पोलनुसार भाजपच्या जागा कमी होतील,पण राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांकडे असेल. आगामी काळात या राज्यांमध्ये घडामोडी वेगाने घडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आजमितीस सहा मोठे राजकीय पक्ष बनले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विभाजन झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष आहे.

टाइम्स नाऊ नवभारतने केलेल्या एका सर्वेमध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढाई होणार आहे. महायुतीला १३७ ते १५२ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला १२९ ते १४४ जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. या ओपिनियन पोलनुसार भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. तरीही मागील निवडणुकीचा विचार केला तर यावेळी भाजपच्या जागा कमी होण्याची दाट शक्यता आहे.

एकनाथ शिंदे लोकप्रिय
मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेच्या मनात कोण आहे असाही प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यामुळे सर्वेत याबाबतही मते जाणून घेण्यात आली. या पोलमधून जे निष्कर्ष समोर आले त्यानुसार राज्यातील ३७ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांनाच पसंती दिली. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी २१-२१ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. शरद पवार यांना दहा टक्के तर अन्य नेत्यांना 11 टक्के मते मिळाली.

लाडकी बहिण योजनेचा किती फायदा
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा मिळेल का असा प्रश्न विचारला जात आहे. या संदर्भातही सर्वे करण्यात आला. ५८ टक्के लोकांच्या मते ही योजना खूप चांगली आहे. २४ टक्के लोकांना वाटते की ही योजना काही प्रमाणात चांगली आहे. तर सहा टक्के लोकांना वाटतं की या योजनेचा महायुतीला निवडणुकीत काहीच फायदा मिळणार नाही. सात टक्के लोकांनी ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी महायुतीचा प्रचाराचा नवा मार्ग असल्याचे सांगितले.