राष्ट्रवादीचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारा संवेदनशील नेता हरपला –उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, दि. ११:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वल्लभशेठ बेनके हे १९८५ साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते, त्यानंतर १९९० मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले. वर्ष २००४ व २००९ मध्ये पुन्हा त्यांनी जुन्नर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे आमदार अतुल बेनके आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आमदार अतुल बेनके आणि कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.