माजी खासदार काकडेंचे मोदींना पत्र – “पुण्यातून निवडणूक लढा”
पुणे,१ सप्टेंबर २०२३: येत्या वर्षी देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीत एक देश, एक निवडणूक शक्य आहे का? याची चाचपणी करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यातच आता माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी गळ घातली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा भाजपचा पक्षांतर्गत विषय असल्याचे सांगत प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अद्याप झालेली नाही. मात्र, पुढील वर्षी या मतदारसंघातून भाजपाचे सुनील देवधर इच्छुक असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात चालू आहे. त्यापाठोपाठ अवघ्या काही तासांत खुद्द मोदीच या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली. यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र, यानंतर भाजपाचे स्थानिक नेते संजय काकडेंनी थेट मोदींना पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे.
“जेव्हा तुम्ही गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली तेव्हा त्या राज्यात ९० ते १०० टक्के भाजपाला यश मिळाले. पुण्यात तुमचा विजय १०० टक्के असून राज्यातही ९० ते १०० टक्के भाजपाचे असेल”, असं काकडेंनी पत्रात म्हटलं आहे.
माध्यम प्रतिनिधींनी या चर्चेबाबत विचारणा केली असता अजित पवारांनी तो मोदींचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. “या चर्चेवर प्रश्नचिन्ह आहे. रोज काहीतरी बातम्या येत असतात. मोदींचा स्वत:चा मतदारसंघ पहिल्यापासून गुजरातचा आहे. तरी ते मागे वाराणसीतून निवडून आले आहेत. सुरुवातीला तर दोन्ही मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या नावावर दोन्ही वेळेला भाजपाच्या ३०० पेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या उभ्या भारताने पाहिल्या आहेत. “निवडणुकीसाठी आपण कुठून उभं राहावं हा त्यांचा अधिकार आहे. ही बातमी मी वाचली आहे. पण त्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे अशा गोष्टीवर आपण कुठे चर्चा करण्यात वेळ घालवायचा? असं मला वाटलं. तो सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा स्वत:चा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते निर्णय घेतील”, असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.