माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

पुणे, २६ आॅक्टोबर २०२२: शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे बुधवारी (ता. २६) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण आणि सून, नातवंडे असा परिवार आहे.
माजी आमदार विनायक निम्हण यांना दुपारी हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. ऐन दिवाळीत निधन झाल्यामुळे निम्हण कुटुंबीयांवर आणि कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विनायक निम्हण हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे १२ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. ते सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. पहिल्या दोन वेळा ते शिवसेनेचे सदस्य म्हणून निवडून आले.नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंड करून बाहेर पडल्यानंतर निम्हण हे राणे यांच्यासोबतच होते. त्यामुळे तिसर्‍यांदा ते शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजय काळे यांनी निम्हण यांचा पराभव केला. त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले होते. गेले काही महिने ते सक्रिय राजकारणापासून लांब होते.