पुणे महापालिकेचे माजी आयुक्त लोकसभेच्या रिंगणात
मुंबई, १६ मार्च २०२४ : पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणारा अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ही बातमी तुम्हाला आश्चर्यकारक वाटू शकते. पण हो हे खरे आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी भाजपच्या तिकीटावर ठाकरे गटाचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. २० मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. परदेशींनी नुकताच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशचे (मित्रा) सीईओ पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे परदेशी हे १९९५ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. १९९३ मध्ये किल्लारीत भूकंप झाला तेव्हा ते लातूरचे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी त्यांनी केलेले काम आणि बचाव कार्य हे आजही एक रोल मॉडेल म्हणून देशभरात वापरले जाते. याचमुळे आज ३० वर्षांनंतरही इथल्या भूकंपग्रस्त भागात फिरताना खेडवळ भागात या आयएएस अधिकाऱ्यांचे नाव अनेक लोक घेत असतात. परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात ग्लोबल प्रोग्राम कोऑर्डिनेटर, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई मनपाच्या आयुक्त, मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.
बसवराज पाटील यांचेही नाव चर्चेत
उमरग्याचे काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लिंगायत मतांची मदत भाजपला होणार आहे. धाराशिवमधून पाटील निवडणूक लढविणार असे बोलले जात असताना त्याच वेळी प्रवीणसिंह परदेशी यांचेही नाव समोर आले. परदेशी हे मुळचे मराठवाड्याचे नसले तरीही त्यांना आजही इथले लोक हिरो मानतात. शिवाय त्यांना या भागातील खडा न् खडा माहितीही आहे. त्यांच्याबद्दलच्या या जनभावनेचा आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग आगामी लोकसभेसाठी करण्याच्या विचारात भाजप आहे. भाजपचे नेते राणा जगजीतसिंह पाटील हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नाहीत. तर शिंदे गटाकडून रवींद्र गायकवाड इच्छुक आहेत. मात्र त्यांची ताकद काहीशी मर्यादित स्वरुपाची झाल्यामुळे त्यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे. यातूनच प्रविणसिंह परदेशी यांचे नाव पुढे येत आहे. अनेक बड्या नेत्यांमार्फत परदेशी हे उमेदवार असतील असा निरोप दिला आहे.
शाहांचा विरोधकांना सवाल
महाविकास आघाडीत सध्या हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या ताब्यात आहे. मागील पाच वर्षांच्या काळात राजेनिंबाळकरांनी मतदारसंघातील संपर्क आणि वावर यामुळे स्वतःचा एक वेगळा प्रभाव निर्माण केला आहे. याशिवाय ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले आहे. यापूर्वीपर्यंत धाराशिव मतदारसंघ राज्यात तसा फारसा चर्चेत नसायचा. पण 2019 पासून त्यांच्यामुळे या मतदारसंघाची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आता ठाकरेंनी आतापर्यंत चांगल्यारितीने बांधून ठेवला आहे.