काँग्रेसने ठाकरे गटाकडून हिसकावून घेतली सांगलीची जागा

सांगली, १६ मार्च २०२४ : सांगली हा परंपरागत काँग्रेसचा लोकसभा मतदारसंघ आहे. तो ठाकरे गटाला दिला तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू असा इशारा सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी दिला होता. यावरून प्रचंड तणाव निर्माण झालेला असताना ही जागा अखेर ठाकरेंच्या तावडीत जाताना काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी सोडवून आणली. त्यामुळे आता येथे काँग्रेसच्या विशाल पाटील यांची भाजपच्या संजयकाका पाटील यांच्यासोबत लढत होणार आहे.

सांगलीसोबत कोल्हापूर आणि भिवंडी हे दोन मतदारसंघही काँग्रेसला सोडण्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असल्याची माहिती आहे. सांगलीच्या बदल्यात काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जालना मतदारसंघ आणि संजय लाखे पाटील यांच्या रुपाने उमेदवारही देऊ केला आहे. त्यामुळे जालन्यात आता भाजपच्या रावसाहेब दानवे विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय लाखे पाटील यांच्यात लढत होणार आहे.

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत. या दरम्यान, गुरुवारी (१४ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये त्यांची भेट घेऊन जागावाटपावर चर्चा केली होती. यावेळी राऊत यांच्या माध्यमातून गांधी यांनी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेत कोल्हापूर, सांगली व भिवंडी या जागा काँग्रेससाठी सोडण्यास शिवसेना तयार झाली. तर जालना ठाकरेंना मिळाला आहे.
आता नवीन समीकरणानुसार कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती हे उमेदवार असणार आहेत. तर सांगलीत विशाल पाटील आणि भिवंडीमध्ये जिजाऊ ब्रिगेडचे नीलेश सांबरे हे उमेदवार असणार आहेत. तर जालन्यात काँग्रेसमधून आयात केलेले संजय लाखे पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार असणार आहेत.