माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक

मुंबई, २४ मे २०२३ ः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असून, ते अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असल्याचे रुग्णालयाने मेडिकल बुलेटीनद्वारे स्पष्ट केले आहे.

मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारांसाठी २२ मे रोजी हलवण्यात आले होते. त्यांच्यावर २४ तास उपचारकेल्यानंतर रुग्णालयाने याबाबत माहिती दिली आहे. मनोहर जोशी यांच्या प्रकृतीसंबंधित माहिती देण्याकरता हिंदुजा रुग्णालायने मेडिकल स्टेटमेंट जारी केले आहे. यानुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी २२ मे रोजी आपत्कालीन परिस्थितीत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सेमिकोमामध्ये असून त्यांचा श्वासोच्छवास सुरू आहे. तसंच मनोहर जोशी वेंटिलेटरवर नसल्याचंही रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.

रुग्णालयाने म्हटलं आहे की, “मनोहर जोशी यांची परिस्थिती चिंताजनक असून ते अर्धवट बेशुद्धावस्थेत (semi comatose) आहेत. त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यांना जोशी सर असंही संबोधलंं जातं. मनोहर जोशी यांचं वय ८६ वर्षे आहे. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली होती. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. तर शिवसेना भाजपाच्या युतीचं सरकार जेव्हा १९९५ मध्ये आलं तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्रीही झाले होते.
गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भुषवलं आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप