उच्च शिक्षण मोफत करण्याचा भाजपला विसर राष्ट्रवादी काँग्रेसने केले आंदोलन
पुणे, २० जुन २०२४: सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द म्हणजे सरकारचे धोरण असे मानले जाते. सरकारवर असलेला हा जनतेचा विश्वास भारताच्या व महाराष्ट्राच्या यशस्वी वाटचालीचा पाया आहे. सध्या मात्र केंद्र व राज्य दोन्ही स्तरांवर सवंग घोषणाबाजीला पेव फुटले आहे. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणा करायची आणि निवडणुका पार पडताच केलेली घोषणा विसरून जायची हा प्रकार म्हणजे जनतेची फसवणूक आहे. असाच प्रकार महाराष्ट्रात घडला असून या फसवणुकीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यात तीव्र आंदोलन केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ फेब्रुवारी रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भर सभेत घोषणा केली की “दिनांक १ जून २०२४ पासून राज्यातील सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार”. राज्यातील तमाम जनतेने ही घोषणा ऐकली, भाजपच्या सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी, आयटी सेलने सोशल मीडियावर स्वतःच्या पक्षाचे आभारही मानले. त्यानंतर लोकसभा निवडणूक आली, या निवडणुकीतही भाजपने मुलींना मोफत शिक्षण देतोय म्हणून गावोगावी प्रचार केला. मात्र निवडणूक संपताच भाजपला स्वतःच्या घोषणेचा विसर पडला, १ जून पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू झाले, विद्यार्थिनींच्या मागे पैशांचा तगादा लागला. सरकारवर विश्वास ठेवून मोफत शिक्षण घेऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थिनी पैशांच्या विवंचनेने त्रस्त असताना सत्ताधारी पक्ष मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे. सरकारच्या या स्वार्थी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आज तीव्र आंदोलन करण्यात आले.
जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनात महाराष्ट्राला फसवणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. “घोषणा मोठी झाली खोटी, कस काय सरकार बर हाय का जनतेला फसवलं खरं हाय का” अशा घोषणांनी संपूर्ण शिवाजीनगर परिसर दुमदुमला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनास प्रशांत जगताप, किशोर कांबळे, पप्पू घोलप, रवींद्र कलमकर, उदय महाले, आशाताई साने, पूजा काटकर, राजेश आरने, समीर पवार, अजिंक्य पालकर, मनीषाताई भोसले, स्वप्नील जोशी, कणव चव्हाण, सचिन तावरे तथा मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.