भाजपने पहिलेंदाच मातंग समाजाला विधान परिषदेवर आमदार केले
पुणे, १५ जुलै २०२४ : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि शिर्डी मतदार संघातून देखील माझे नाव चर्चेत होते. परंतु पक्षाने थेट आमदार केले. आजपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने मातंग समाजाला विधान परिषदेवर संधी दिली नाही. भाजपने ही संधी दिली, असे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गोरखे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गोरखे यांनी आपली भूमिका मांडली. संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही समाजाला न दुखविता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत अनुसूचित जातींसाठी काम करावयाचे आहे. विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानंतर मला विधान परिषदेवर संधी मिळण्यामागे सर्वात मोठा वाटा हा माझा समाजाचा आहे. त्यानंतर माझ्या आई-वडीलांचे असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
गोरखे म्हणाले,‘‘ पक्षाकडून मी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी इच्छुक होतो. परंतु वॉर्ड महिला झाल्याने माझी संधी गेली. यापूर्वी दोन ते तीन वेळा अशीच संधी हुकली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि शिर्डी मतदार संघातून देखील माझे नाव चर्चेत होते. परंतु पक्षाने थेट आमदार केले. आजपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने मातंग समाजाला विधान परिषदेवर संधी दिली. परंतु भाजपने हे करून दाखविले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसांपर्यंत मला अशी संधी मिळेल, असे वाटले नव्हते.’’
राज्यातील मागास असलेल्या ५९ जातींसाठी काम करायचे आहे. अनेक जातींना कुठलाच निधी मिळाला नाही. शिक्षणदृष्ट्या मातंग समाजाचीही प्रगती झालेली नाही. या समाजातील तरुण ‘आयएएस’ कसे होतील, याकडे मी लक्ष देणार आहे., असे सांगून गोरखे म्हणाले,‘‘ घटनेत बदल करण्याचा अधिकार कोणालाच दिला नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी नॉरेटिव्ह सेट करण्यात येत आले. आरक्षण हा राजकीय विषय आहेत. कुणालाही न दुखवता सगळ्यांना कसे देता येईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’’