फडणवीस राजीनामा द्या: सुप्रिया सुळेंची टीका
पुणे, २१ ऑगस्ट २०२४: लाडकी बहिण योजनेच्या जाहीरातबाजीसाठी सरकार २०० कोटी खर्च केले जात आहे. पण महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढत आहेत. बदलापूरचे प्रकरण अतिशय असंवेदनशीलपणे हाताळले गेले, लोक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला जाग आली. नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर सरकारचा धाक नाही. मुलींवर अत्याचार होऊनही शिक्षण मंत्रालयाने याची दखल घेतली नाही. आंदोलन सुरु झाल्यानंतर शिक्षण मंत्री जागे झाले. या राज्याला पार्टटाइम गृहमंत्री असून, महाराष्ट्रात कमी आणि दिल्लीत जास्त असतात. त्यांनी पोलिसांचे निलंबन केले असले तरी त्यातून प्रश्न सुटणार नाही. नैतिक जबाबदार स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने महिला पत्रकाराबद्दल जे बोलले त्याचा निषेध करते. त्याची मानसिकता यातून दिसते, असेही सुळे यांनी सांगितले.
बलात्कार लपविण्यासाठी गुन्हे दाखल
बदलापूर येथे संतप्त झालेल्या पालकांनी आंदोलन केले. हे बलात्कार झाला हे नाकारतात का? आंदोलन करणे हे चूक आहे का? याचे उत्तर सरकारने द्यावे. बलात्कार लपविण्यासाठी हे राजकारण केलं जात आहे. बलात्काराची चौकशी करण्याऐवजी ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. आणि जर हा गुन्हा कोण असेल तर तो मला मान्य आहे. महिला जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार सरकारने आम्हाला जेलमध्ये टाका नाहीतर फाशी द्यावी, आंदोलन झाले नसते तर बदलापूरमधील घटना उघडकीस आली नसती, अशी टीका सुळे यांनी केली.
गाडीत बिघाडची चौकशी व्हावी
अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे एका टॅक्सीत गेले. तिघांच्याही गाड्या एकाच वेळी कशा बंद पडल्या. मला काळजी वाटली, तिघांच्या गाडीत बिघाड झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे,पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघावे, असेही सुळे म्हणाल्या.