महाविकास आघाडीमध्ये वंचितचा प्रवेश निश्चित नाही – प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने पुन्हा संभ्रम
पुणे, २८ फेब्रुवारी २०२४: गेल्या चार-पाच महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार अशा चर्चा सुरू आहेत. आघाडीच्या काही बैठकांना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित होते. त्यानंतर देखील ही आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत गोंधळ होईल याच पद्धतीने व त्यांचे वक्तव्य सुरू ठेवले आहेत. पुण्यातील मेळाव्यात त्यांनी आपल्याला भाजपचा आणि संघाचा पराभव करायचा आहे, पण आपला महाविकास आघाडीमध्ये अजून प्रवेश निश्चित झालेला नाही. असे वक्तव्य केल्याने संभ्रमाचे वातावरण तयार केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पुण्यात सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते प्रा. टी. पी. मुंडे, ‘वंचित’चे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, सोमनाथ साळुंखे, अनिल जाधव, प्रियदर्शिनी तेलंग, शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी, युवा नेते सुजात आंबेडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रातील भारतीय जनता पक्ष (भाजप)-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार हे पुन्हा सत्तेत येण्यासाठी विविध राजकीय पक्षांना फोडू लागले आहे. विविध पक्षाच्या नेत्यांना आतापासूनच पळवू लागले आहेत. हे सरकार आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी दंगलीसुद्धा घडविण्याचे प्रयत्न करेल. मात्र केंद्रात पुन्हा हे सरकार येणार नाही, याची काळजी आपण येत्या लोकसभा निवडणुकीत घेण्याची गरज आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत युती होईल की नाही, हे सांगता येत नाही. मात्र महाविकास आघाडीसोबत युती करण्यास’वंचित’ची तयारी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले.
येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्यासाठी आणि आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि मुस्लिम समुदायाने राजकीय समझोता केला पाहिजे. शिवाय मुस्लिम समुदायाने अलिप्त न राहता त्यांचा विविध समुदायांशी सहभाग वाढविला पाहिजे. हा सहभाग वाढविण्यासाठी हा राजकीय समझोता करावा, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.
आंबेडकर म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मतदाराने प्रत्येकी किमान पाच मतदार जोडावेत. सत्तेत बसलेले निजामी मराठे स्वत:च्या तुंबड्या भरून घेत आहेत.ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा आरक्षण आंदोलन जिरवायचे नसेल तर, मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक निवडणूक लढविली पाहिजे. मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढविल्यास, भाजप-कॉंग्रेसमधील निजामी मराठे जरांगे यांना संपविणार. केंद्रातील भाजप-आरएसएस सरकारमुळे लोकशाही, संविधान आणि राज्य घटनेने दिलेले सर्व आरक्षण धोक्यात. राज्य घटनेने दिलेले आरक्षण फक्त कागदावरच ठेवण्याचा सरकारचा डाव आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी नव्हे तर, आपले अधिकार शाबूत ठेवण्यासाठी भाजपविरोधात मतदान करा. संघटीतपणे मतदान झाले तर भाजप-संघाचे सरकार पडेल.