उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंच्या कामाची गती दुप्पट – खरी शिवसेना कोणाची यावर आंबेडकरांनी केले भाष्य
जालना, ५ ऑगस्ट २०२४: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता त्यांचा स्ट्राईक रेट हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा दुप्पट असून शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाच खरी शिवसेना मानू लागले आहेत, असं स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेसचे नेते कणाहीन असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची तुलना केली, तर एकनाथ शिंदे यांची कामगिरी सरस आहे. याचा सरळसरळ अर्थ असा आहे, की जी शिवसेनेची मते आहेत, ती एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आणि शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाच खरी शिवसेना मानत आहे. उद्धव ठाकरे यांची कामगिरी ही आरक्षणवादी आणि मुस्लीम मतांमुळे वाढली आहे असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.
राज्यात सध्या गरीब आणि श्रीमंत मराठा वाद सुरु आहे. श्रीमंत मराठ्यांनी महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामधील पुढाऱ्यांना विकत घेतले आहे. सत्ता त्यांनी स्वत:कडे काबीज केली आहे. ही तिन्ही पक्ष श्रीमंत मराठ्यांचे आहे. राज्यात सध्या जे भांडण सुरू आहे. ते गरीब आणि श्रीमंत मराठ्यांचे सुरू आहे. त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा बळी दिला जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार ओबीसींची जात निहाय जनगणना मान्य करून घेईल. तसंच जात जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तो पर्यंत ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली जाईल. असा निर्णय घेतला जाईल, असे अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे आम्ही किमान १०० ओबीसी आमदार निवडून आणा, असे आवाहन करीत आहोत असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप