अमित शहा सोबत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरापर्यंत खलबतं, मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

दिल्ली, ५ जून २०२३: सर्वोच्च न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारला दिलासा दिल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे लक्ष लागलेली आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री दिल्लीत धाव घेत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सुमारे दोन तास झालेल्या चर्चेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावर स्पष्टता देण्यात आलेली नाही .
रविवारी सायंकाळी पुण्यातील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूर येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी दिल्ली गाठली. त्यानंतर या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.

या बैठकी संदर्भात एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे.“कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणुका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला”, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे

महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार ….”, असा विश्वासही त्यांनी यावेळी ट्वीटद्वारे व्यक्त केला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप