बंडखोरांच्या माघारीसाठी नेत्यांचे प्रयत्न

पुणे, १ नोव्हेंबर २०२४ः पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न पक्षाच्या नेत्यांकडून सुरु झाले आहेत. ‘ही निवडणूक आपल्यासाठी अवघड आहे, तुम्ही अर्ज मागे घ्या, पक्ष आपल्याला न्याय देईल’ असे आश्‍वासने बंडखोरांना दिले जात आहे. पण ‘अनेक वर्षात काही मिळाले नाही, निवडणूक लढविणारच’ असा प्रतिवाद बंडखोर करत आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत (ता. ४) किती बंडखोर माघार घेणार याकडे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी बारामती आणि वडगाव शेरी मतदारसंघ सोडता उर्वरित १९ मतदारसंघात ५० पेक्षा जास्त बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पुरंदर, भोर, इंदापूर, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, पर्वती, कसबा, शिवाजीनगर, शिरूर या मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीतील मातब्बर इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. त्यांचे अर्ज छाननीमध्येही पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी आता पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या बंडखोरांना फोन ‘पक्ष भविष्यात तुम्हाला न्याय येईल, चुकीचे पाऊल उचलून स्वतःचे आणि पक्षाचे, मित्र पक्षाचे नुकसान करू नये.’ अशा सूचना दिल्या जात आहेत. पण बंडखोर अद्याप ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. आम्ही पक्षात २०-३० वर्ष काम केले, यापूर्वी उमेदवारी मागितली पण न्याय मिळाला नाही, त्यामुळे निवडणूक लढवणार’, असे बंडखोर सांगत आहेत. काही बंडखोरांनी माझ्याशी संपर्क साधू नका, कोणालाही भेटायला पाठवू नका असे निरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

तुम्ही माघार घ्या तर आम्ही घेतो
पुणे ग्रामीण मधील अनेक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. तुमचे बंडखोर मागे घ्या, तर आम्ही अर्ज मागे घेऊ असे सांगितले आहे. हा सर्व दबावतंत्राचा खेळ चार नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.