ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; शिंदे गटाचं एक पाऊल मागे
मुंबई, १० आॅक्टोबर २०२३ ः ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस ओव्हल मैदानावर होणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून निर्माण झालेला दसरा वेळाव्याचा वाद थांबणार आहे.
दरम्यान गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटामध्ये जोरदार संघर्ष पेटल्याचं दिसून आलं होतं. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षी ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आता, यंदाच्या वर्षी कोणाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर गाजणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र या दरम्यान आता शिंदे गटाने एक पाऊल मागे घेतलं असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी माहिती दिली आहे की, शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस ओव्हल मैदानावर होणार आहे.
तर गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे संजय राऊत आणि शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यात वाक् युद्ध रंगल होतं. त्यावेळी संजय शिरसाट म्हणाले होते की, दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान आम्हालाच मिळालं पाहिजे, आम्हाला नाही मिळालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. विरोधक सत्तेत असताना त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची साधी विटही रचता आलेली नाही, शिवसेना प्रमुखांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत.
त्यावर राऊतांनी त्यांना उत्तर देताना म्हटले होते की, दसरा मेळावा जिथं होतो तिथं इतिहास होतो, ५०-५५ वर्षांपासून आम्ही दसरा घेत आहोत. आता हे बेईमान लोकं त्याच्यावर दावा सांगातहेत. शिवसेनेची, मराठी माणसाची ताकद कमी करणं हेच आहे. हे षडयंत्र आहे. शिवसेनेच्या समोर शिवसेनेच्या लोकांचं आव्हान उभं केलं जात आहे. तुम्ही कितीही आव्हानं द्या, रॅली होणारच आणि ही रॅली शिवतीर्थावरच होणार. तुमच्या सत्तेने आम्हाला चिरडण्याचं काम केलं, दिल्लीतून आर्मी बोलावली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. रॅली होणारच आणि तीही शिवतीर्थावरच, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.