बातम्या पेरू नकात, छगन भुजबळ नाराज नाहीत: अजित पवारांचे स्पष्टीकरण
पुणे, १४ जून २०२४: राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. काल मात्र त्यांच्या उमेदवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या निर्णयावरून राजकारणात वादळ उठलं होतं. पक्षात अन्य ज्येष्ठ नेते आणि इच्छुक उमेदवार असताना लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवाराला पुन्हा उमेदवारी देण्याचं कारण काय? छगन भुजबळांसह अन्य पदाधिकारी इच्छुक असताना त्यांना डावलण्यात आलं. सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीतील शिवसेना आणि भाजपाचा एकही नेता हजर नव्हता अशा चर्चा सुरू होत्या. या सगळ्या चर्चांवर आज स्वतः अजित पवार यांनी उत्तरं देत फुलस्टॉप दिला.
आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या पालखी आणि पालखी मार्गांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने अजित पवार आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत असे विचारल्यावर अजित पवार चांगलेच संतापले. हे धादांत खोटं आहे. तुम्हाला प्रसारमाध्यमांना काही माहिती नसतं. तुम्ही फक्त बातम्या पेरण्याचं काम करता. विरोधक किंवा आमच्याच मित्रांनी या बातम्या पेरल्या. पण त्यात काहीच तथ्य नाही असे अजित पवार म्हणाले.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी चारच जणांना परवानगी असते. तेव्हा छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नरहरी झिरवाळ तेथे उपस्थित होते. आमच्यात कुणीही नाराज नव्हते. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालं होतं. अस्थिविसर्जनासाठी ते गेले होते. दुःखाच्या प्रसंगात त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चला असं म्हणणं योग्य नव्हतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही आम्ही आदल्या दिवशीच सांगितलं होतं. त्यांनीही महायुती बरोबरच आहे असे स्पष्ट केले होते. निवडणूक बिनविरोधच होणार होती त्यामुळे त्यांना बोलावलं नव्हतं. इतकं सगळं स्पष्ट असतानाही तुम्ही बातम्या लावल्या अशा शब्दांत अजित पवार यांनी महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले.
काय म्हणाले होते भुजबळ?
आज (दि.१४) पुण्यात माध्यंमांशी बोलताना मला खासदार व्हायची इच्छा आहे म्हणूनच नाशिक लोकसभा लढवण्यासाठी तयार झालो होते. दिल्लीतून माझी उमेदवारी फायनल झाली होती त्यामुळे तयारीला लागालो होतो. पण महिनाभर झाला तरी माझं नाव जाहीर होईना म्हणून मी माघार घ्यायचे ठरवले. माघार घेतल्यानंतरदेखील १२ ते १५ दिवसांनंतर उमेदवारी जाहीर झाली. या सर्वाचे परिणाम जय-पराजय याच्यावर होत असतात असे भुजबळ म्हणाले.
भुजबळांना यावेळी राज्यसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही याबद्दल नाराजी आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, मला राजकारणात ५७ वर्ष झाले आहेत. अनेकवेळा असे झाले पाहिजे झाले असे वाटते. पण नेहमी मनासारखे होत नाही. काहीवेळा तडजोडी कराव्या लागतात. दोन्ही वेळेस अन्याय झाला का? याचे उत्तर अजितदादांनाच विचारा असे ते म्हणाले.