आमदार निघून गेले म्हणजे जनाधर गेला असा गैरसमज करू नका: जयंत पाटलांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अजित पवारांनी पक्षावरच दावा ठोकला. याप्रकरणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाली. कालच्या सुनावणीत अजित पवारांच्या गटाने आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा केला. दरम्यान, यावरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पवारांच्या हातातून पक्ष निसटला, असं विधान केलं. यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
पवारांच्या हातातून पक्ष निसटला आहे. आता राहुल गांधी यांना बारामतीला आणलं तरीही त्याचा उपयोग होणार नाही, या बावनुकळेंच्या वक्तव्याविषयी जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, एकटे शरद पवार काफी है! राहुल गांधी यांना बारामतीत आणायची गरजच नाही. त्यामुळं आमदार निघून गेले म्हणून जनाधार निघून गेला असा गैरसमज करून घेऊ नये. नाहीतर चंद्रशेखर बावनकुळे यांना दारोदारी फिरून पुढचा पंतप्रधान कोण असावा हे विचारायची वेळ आली नसती, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.
नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीती दिलेली नावं कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारली. याविषयी विचारलं असता पाटील म्हणाले, तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मला त्याबद्दला काही सांगता येणार नाही. नाना पटोले आणि पक्षश्रेष्ठींचं बोलणं झाल्यानंतर अंतिम नावांची शिफारस होईल.
कालच्या सुनावणीत अजित पवार गटाने शरद पवार पक्ष चालवतात, असा दावा केला. यावरून पाटील यांनी अजित पवार गटाला चांगलचं फटकारलं. शरद पवार यांच्यामुळे अनेक जण मंत्री झाले. १७-१८वर्ष अनेक जण मंत्री राहिले तेव्हा शरद पवार यांची कोणतीही कृती त्यांना चुकीची वाटली नाही. आणि आज त्यांची अडचण निर्माण झाली म्हणून ते शरद पवार यांना दोष देत देत आहेत. मात्र, सगळा दोष पवारांवर देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार आहे, तो जनता कदापी मान्य करणार नाही, असं इशारा पाटील यांनी दिला.
नवाब मलिक हे अजित पवार गटात सामील होण्याच्या चर्चा रंगल्या आहे. याबाबत बोलतांना पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. त्यामुळे ते कोणाच्या गटात आहेत, याचे कुठं भाष्य केलं नही. मलिक हे अजित पवार गटासोबत जात असल्याची माहिती मला प्रसारमाध्यमांकडून मिळाली आहे. मात्र, मलिक तसं कुठं बोलले नाहीत.