भाजपच्या शहराध्यक्षांना काही अधिकार आहे की नाही ? लोकसभेच्या इच्छुकांबद्दल घाटेंची चुप्पी
पुणे, २९ जानेवारी २०२४ ः पुणे शहर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. पण कोण कोण इच्छुक आहेत, शहराध्यक्ष म्हणून तुम्ही इच्छुक आहात का?, इच्छुकांनी अर्ज कुठे करायचे, यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती पत्रकारांनी भाजचपे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडे केली. पण घाटे यांनी एकाही प्रश्नाला थेट उत्तर न देता प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय समितीकडे बोट केले. त्यामुळे भाजपच्या शहराध्यक्षांना काही अधिकार आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भाजपने आागामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. यातील पहील्या टप्प्यात पुणे शहर लोकसभा मतदारसंघात बुथ चलो अभियान राबविले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहर भाजप सज्ज झाल्याचे शहर प्रमुख धीरज घाटे यांनी जाहीर केले.
घाटे म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात पुणे शहर, मावळ, बारामती, शिरुर असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. ग्रामीण भागात लोकसभा निवडणुकीसाठी ‘गाव चलो अभियान’ राबविले जाणार आहे. तर शहरी भागात बुथ चलो अभियान राबविले जाणार आहे. या अभियानासाठी समिती तयार केली आहे. यात पक्षाचे सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार , नगरसेवकही सहभागी होणार आहे. या बुथ अभियानात दुसऱ्या बुथ मधील कार्यकर्ता, पदाधिकारी हा दुसऱ्या बुथ मध्ये जाऊन पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहे. तसेच ‘पन्ना यादी’ ( मतदार यादी ) तयार केली जाणार आहे. संबंधित बुथ अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. शहरात २ हजार १० बुथ असुन, या प्रत्येक बुथवर दुसऱ्या बुथवरील कार्यकर्ते लक्ष देणार आहे. हे काम तात्पुरत्या स्वरुपाचे असुन, कोणत्याही प्रकारची पडताळणी करण्याचा हेतू यामागे नाही’’ असे घाटे यांनी नमूद केले.
भाजपमध्ये पुण्यातून धीरज घाटे यांच्यासह मुरलीधर मोहळ, जगदीश मुळीक, सुनील देवधर, राजेश पांडे, शिवाजी मानकर, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ यांच्याह आणखी डझनभर इच्छुत आहेत. पण पक्षाकडून लोकशाही पद्धतीने अर्ज मागविणार का यावर भाजपमध्ये स्पष्टता नाही. त्यामुळे पत्रकार परिषदेत घाटे यांनी उत्तर दिले नाही.
काँग्रेसमध्ये तर तयारीच नाही एकीकडे भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. बुथ अभियानाच्या माध्यमातून मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीत अजुनही बैठकांचे सत्र सुरु आहे. पुण्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अद्याप तयारीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी जोरात सुरु आहे.