निर्लज्जाप्रमाणे हसता काय? प्रशांत किशोर यांची शिंदे फडणवीसांवर टीका
दिल्ली, ११ मे २०२३ : सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला प्रतोद नियुक्ती, राज्यपालांचे आदेश यावरून फटकारलेले असतानाही पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हसत हसत सरकार टिकल्याचा आनंद साजरा केला. त्यावर ज्येष्ठ वकील प्रशांत किशोर यांनी न्यायालयाने तुम्हाला फटकारले असताना निर्लज्जाप्रमाणे हसता काय जळजळीत सवाल करून त्यांच्यावर टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज (११ मे) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. न्यायालयाने शिंदे गट आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे काही निर्णय चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. राज्यपालांचं सगळे निर्णय चुकीचे होते. शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्तीही बेकायदेशीर होती, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना सत्तेत परत बोलावणं शक्य होतं. पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगणं योग्य नाही. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, असंही न्यायालयाने म्हटलं.
न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजुने लागला असून हा लोकशाहीचा विजय आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं.
शिंदे-फडणवीसांच्या याच कृत्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. प्रशांत भूषण आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “शिंदे गटाचा व्हिप बेकायदेशीर होता आणि राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना विश्वासदर्शक ठराव घेण्यास सांगणं, हेही बेकायदेशीर कृत्य होतं, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. तरीही न्यायालयाने त्यांना (एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस) खुर्चीवरून हटवलं नाही, त्यामुळे ते निर्लज्जासारखं हसतायत. पण येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल, यात काही शंका नाही.”